सोलापूरच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच
चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे आणि दत्तात्रेय भरणे यांच्यात स्पर्धा होण्याची शक्यता
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे खातेवाटप जाहीर केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक काथ्याकूट झाल्यानंतर हे खातेवाटप जाहीर झालेले आहे. खाते वाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच होणार असल्याचे दिसून येत आहे.
रायगडमध्ये रंगलेल्या वाक्युद्धाने त्याची चुणूक दाखवली आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या शहरांच्या पालकमंत्रिपदावरून तीनही पक्षांमध्ये ओढाताण होणार हे स्पष्ट आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात सोलापूरला स्थान न मिळाल्याने पालकमंत्रीही बाहेरचा असणार, हे स्पष्ट आहे. सोलापूरच्या पालकमंत्रिपदासाठी चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे आणि दत्तात्रेय भरणे यांच्यात स्पर्धा होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याची समीकरणेही सोलापूर आणि सातारा कोणाकडे जातो, यावर ठरणार आहे.
महाविकास आणि महायुती सरकारच्या काळात सोलापूरला मंत्रिपद मिळाले नव्हते, त्यामुळे मागील पाच वर्षांत सोलापूर बाहेरचे पालकमंत्री होते. त्यात महाविकास आघाडीच्या काळात तब्बल तीन पालकमंत्री झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या सुरवातीच्या काळात सोलापूरची जबाबदारी ही माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी सोलापूरला येणे टाळले होते.
वळसे पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या काळात अपवाद वगळता ते सोलापूरला फिरकले नव्हते. आव्हाड यांच्यानंतर ती जबाबदारी अजित पवार यांचे विश्वासू साथीदार दत्तात्रेय भरणे यांच्या खांद्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुतीने पहिल्यांदा राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री केले होते. त्यामुळे सोलापूरचे पालकमंत्रिपद भाजपकडे जाणार की राष्ट्रवादीकडे याची उत्सुकता आहे. सोलापूर जिल्ह्यातील पक्षीय संख्याबळ पाहता सोलापूरचे पालकमंत्रिपद हे भाजपकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजपचे कोणते मंत्री सोलापूरचे पालकमंत्री होणार, याची उत्सुकता वाढली आहे.
पालकमंत्रिपदाचा विचार करता पुणे राष्ट्रवादीकडे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. सातारा गेल्या वेळी शिवसेनेकडे होता. सांगली, सोलापूर भाजपकडे, तर कोल्हापूर राष्ट्रवादीकडे होता. आताही कोल्हापूरचे पालकमंत्रिपद ज्येष्ठत्वाच्या मुद्यावर हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. सांगली हे भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे. पण सोलापूर आणि साताऱ्यात काही बदल होतो का, हे पाहावे लागणार आहे. साताऱ्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे गेले, तर सोलापूर राष्ट्रवादीकडे येऊ शकते.
सोलापूर राष्ट्रवादीकडे आले तर कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळालेल्या दत्तात्रेय भरणे यांच्याकडे पुन्हा एकादा सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी येऊ शकते. अशा वेळी चंद्रकांतदादा हे सांगलीचे पालकमंत्री होऊ शकतात. सातारा पुन्हा शंभूराज देसाईंकडे येऊ शकतो. पण सोलापूर भाजपकडे आले तर चंद्रकांत पाटील किंवा जयकुमार गोरे हे पालकमंत्री होऊ शकतात. गोरे हे सोलापूरला आले तर चंद्रकांतदादा सांगलीला पाठवले जाऊ शकते.
0 Comments