नेहरू युवा केंद्र व क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने सुशासन दिनानिमित्त खुल्या वक्तृत्व स्पर्धा
बार्शी, (कटूसत्य वृत्त):- भारत सरकार द्वारा, क्रीडा व युवक मंत्रालय अंतर्गत, नेहरू युवा केंद्र सोलापूर, क्रांती बहुद्देशीय संस्था, बेलगाव व श्री शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती ( सुशासन दिवस ) निमित्त खुल्या वक्तृत्व स्पर्धा श्री. शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय, बार्शी याठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. "सुशासन सुव्यवस्थित चालवण्यासाठी क्वान्टिटी ला महत्व न देता क्वालिटी ला महत्व दिले तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकतो. तसेच विद्यार्थ्यांनी आपली ध्येयपूर्ती गाठण्यासाठी जिद्ध आणि सातत्य व महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांनी आपल्या मनोगतात म्हटले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जयकुमार शितोळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत वाजपेयींच्या काव्यपंक्तींनी वातावरण प्रफुलित केले.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम क्रमांक - रोख रक्कम 1001 रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, द्वितीय क्रमांक - रोख रक्कम 701 रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, तृतीय क्रमांक - रोख रक्कम 501 रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, उत्तेजनार्थ - रोख रक्कम 301 रुपये, व सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे खजिनदार जयकुमार शितोळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव, मंडळ अधिकारी प्रशांत कोरके, श्री. शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक गुंड, क्रांती बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष धिरज शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे परीक्षण प्रा. शंकर शेटे व डॉ. चंद्रकांत उलभगत यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. जयद्रथ गायकवाड यांनी केले.
0 Comments