मंत्रिमंडळ विस्तारात सोलापुरातून देशमुखांना संधी की नव्या चेहऱ्याला पसंती?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बहुचर्चित शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत दिले आहेत, त्यामुळे भाजपला भरभरून देणाऱ्या सोलापूरला पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार का? आणि मिळाली तर मंत्रिपदाचा मान नेमका कोणाला मिळणार?, याची उत्सुकता आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार हा ११ किंवा १२ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. कारण, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तब्बल पाच आमदार निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत भाजपचे पाच आमदार आणि एका अपक्षाचा भाजपला पाठिंबा होता. मात्र, मागील पंचवार्षिकमध्ये सोलापूरला मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती. मागील पंचवार्षिक एवढीच ताकद सोलापूरने भाजपला पुन्हा दिली आहे, त्यामुळे या वेळी तरी भाजपकडून सोलापूरला मंत्रिपदाची संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे.
सोलापुरातून सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे हे पाच आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. यातील दोन्ही देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी हे मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी मागील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे.
दोन्ही देशमुख हे भाजपमध्ये वरिष्ठ आहेत, त्यामुळे नैसर्गिक न्यायाने त्यांचा मंत्रिपदावर दावा आहे. सुभाष देशमुख यांनी सहकार मंत्री म्हणून काम केले आहे. तसेच विजयकुमार देशमुख हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. हायकमांडकडून या वेळी त्यांच्या नावाला पसंती मिळते का नाही, हे महत्वाचे आहे.
देशमुखांसोबत अक्कलकोटमधून दुसऱ्यांदा निवडून आलेले सचिन कल्याणशेट्टी हेही देवेंद फडणवीस यांचे अत्यंत निकटवतीय म्हणून ओळले जातात. महायुती सरकारच्या काळात त्यांचा उल्लेख 'डमी पालकमंत्री' म्हणून केला जात होता. त्यामुळे दोन देशमुखांमधील गटबाजीला टाळून कल्याणशेट्टींना मंत्रिपदाची संधी मिळू शकते.
देवेंद्र फडणवीस यांच्या युवा टीममधील सर्वांत चर्चेत असणार चेहरा म्हणजे देवेंद्र कोठे. ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, पक्षातील गटबाजी मोडून नव्या चेहऱ्याला पसंती द्यायचे ठरले तर कोठे यांनाही राज्यमंत्रिपदी संधी मिळू शकते.
0 Comments