तानाजी सावंत यांना पुन्हा आरोग्य मंत्री पद मिळावे म्हणून विठुरायाला साकडे
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूरमध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात तानाजी सावंत यांना राज्याच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा लाखो वारकऱ्यांच्या सेवेची संधी मिळावी म्हणून वारकऱ्यांनी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे.
महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी बांधवांसाठी आरोग्यसेवेचे अनेक उपक्रम राबवले. आषाढी वारी आणि कार्तिकी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत सावंत यांनी वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी अनमोल योगदान दिले.
या "आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी" मोफत महाआरोग्य शिबिरांची नोंद सलग दोन वेळा आंतराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन घेतली गेली. तानाजी सावंत यांच्या या समर्पित सेवेला प्रतिसाद म्हणून आज पंढरपूर येथे वारकरी बांधवांनी एकत्र येत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली.
टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की, प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात पुन्हा एकदा आरोग्यसेवेची जबाबदारी सोपवावी. "तानाजी सावंत यांच्या कार्यामुळे आम्हाला वारीत आरोग्याच्या दृष्टीने खूपच मदत झाली. त्यांच्या संकल्पनेतून आम्हाला आरोग्याची उत्तम सेवा मिळाली," असे मत वारकरी बांधवांनी व्यक्त केले.
पंढरपूरच्या पवित्र भूमीतून दिलेला हा संदेश तानाजीराव सावंत यांच्यावरील वारकऱ्यांच्या विश्वासाला आणि प्रेमाला अधोरेखित करतो. राज्य शासनाने याची नोंद घेऊन त्यांच्या अनुभवाचा आणि सेवाभावाचा योग्य सन्मान करावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.
0 Comments