लोकमंगल कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची रेशीम उद्योगास भेट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथील प्रथम व अंतिम वर्षातील रेशीम शेती मॉड्युल मधील विद्यार्थ्यांची दिनांक १३ डिसेंबर रोजी रेशीम कोष उत्पादन तंत्रज्ञान जाणून घेण्याकरिता भोगाव व नानज या ठिकाणी कीटकशास्त्र विभागांतर्गत शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी भोगाव येथील श्री.आदलिंगे यांच्या रेशीम उष्मायन केंद्र व चॉकी संगोपन युनिट तसेच श्री. विभुते यांच्याद्वारे कार्यान्वित असणाऱ्या नानज येथील रेशीम उद्योगास भेट दिली.या प्रात्यक्षिक क्षेत्रीय भेटीदरम्यान दोन्ही युवा उद्योजक तथा प्रगतशील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतले बारकावे, विक्री तंत्रज्ञान, तुती लागवड, चॉकी संगोपन इत्यादी बाबत विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. व्यवसाय वाढीकरता करण्यात आलेल्या उपाययोजना, भविष्यातील व्यावसायिक नियोजन तसेच रेशीम उद्योगातील संधी इत्यादी बाबत त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. सदरील कार्यशाळेच्या क्षेत्रीय भेटीसाठी प्रा. स्वाती खोबरे आणि प्रा. नवनाथ गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालया मार्फत असे विविध उपक्रम नेहमीच राबवले जातात. या प्रक्षेत्र भेटीच्या आयोजनासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील शैक्षणिक भेटीसाठी एकूण २३ विद्यार्थी उपस्थित होते, सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी या भेटीद्वारे कृषी उद्योजक होण्यास नक्कीच मदत होईल अशी भावना आभार प्रदर्शनाद्वारे व्यक्त केली.
0 Comments