ग्रंथालये अधिकाधिक लोकाभिमुख करण्याची गरज
- सुनील हुसे;
जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रंथालय चालकांनी अधिकाधिक वाचकांचे समाधान करणे आवश्यक आहे. ग्रंथालये ही लोकांसाठी असतात. ती अधिकाधिक लोकाभिमुख करण्याची गरज आहे, असे मत जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन छत्रपती शिवाजी प्रशालेत उत्साहात झाले, याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटीवार हे होते. यावेळी व्यासपीठावर ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, कोकण विभागाचे कार्याध्यक्ष मनोज गोगटे, ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात अध्यक्ष विजयकुमार पवार यांनी, जिल्हा ग्रंथालय संघास 'ड' वर्गाच्या ग्रंथालयापेक्षाही कमी अनुदान मिळत केली यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
हुसे यांनी सांगितले की, सोशल मीडिया हा ग्रंथालयाचा शत्रू आहे. पुस्तकांचे वाचन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ते वाढविण्यासाठी ग्रंथालयांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ग्रंथालये अद्ययावत असणे व नवनवीन ग्रंथ खरेदी करून ग्रंथसंग्रह वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८३५ ग्रंथालये ऑनलाइन पद्धतीने जिल्हा ग्रंथालयास जोडण्यात आली आहेत. तर १२ ग्रंथालये अकार्यक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात गजानन कोटीवार यांनी सांगितले, ग्रंथालय चालकांनी किमान ७० टक्के वाचकांचे समाधान करणे आवश्यक आहे. ग्रंथालय संचालनालय व शिक्षण आयुक्त यांच्यात झालेल्या पत्रव्यवहाराप्रमाणे प्रत्येक शाळेचे विद्यार्थी हे ग्रंथालयाचे सदस्य होणे आवश्यक आहेत. तसे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना पाठविले तर सर्व विद्यार्थी ग्रंथालयांना वाचक म्हणून उपलब्ध होतील.
यावेळी प्रकाश शिंदे, हरिदास रणदिवे, जयंत आराध्ये, गुलाबराव पाटील, अनिल पाटील, सारिका मोरे, वृषाली हजारे, अशोक हजारे, सुनील पुजारी यांच्यासह अनेक ग्रंथप्रेमी उपस्थित होते. प्रा. बाळासाहेब चटे यांनी सूत्रसंचालन केले. या अधिवेशनात अंनिसचे ब्रह्मानंद धडके यांनी समितीचे विविध ग्रंथ व नियतकालिकांचा स्टॉल लावला होता.
सर्वांत नवे ग्रंथालय १२ वर्षापूर्वीचे मागील अनेक वर्षांपासून नवीन ग्रंथालयास मान्यता देणे बंद असल्याने सध्या सर्वात नवे ग्रंथालय हे बारा वर्षांपूर्वीचे आहे. सर्व ग्रंथालय चालक हे अनुभवी असून, सोलापूर जिल्हा हा राज्यात सर्वात जास्त ग्रंथालये असणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात ग्रंथालय चळवळीत काम करणारे अनेक पदाधिकारी असून, वाचक वाढणे आवश्यक असल्याचे यावेळी ग्रंथालय अधिकाऱ्यांनी सांगितले.
0 Comments