सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणी वसुलीचे आदेश !
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २३८ कोटी रुपयांच्या बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणी उत्तरदायी धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे २ अधिकारी, १ सनदी लेखापालाकडून वसुली करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
तत्कालीन संचालक मंडळातील ३५ जणांकडून एकूण २३८ कोटी ४३ लाख ९९९ सहस्र रुपये बेकायदेशीर कर्जाची १२ टक्के व्याजासह वसुली करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी दिले आहेत.
या आदेशामुळे बँकेचे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते पाटील, दीपक आबा साळुंखे, रणजितसिंह मोहिते पाटील, दिलीप माने, बबनदादा शिंदे, संजय शिंदे, रश्मी बागल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मोठ्या नेत्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात वर्ष २०१० मध्ये राजेंद्र राऊत यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर कलम ८३ आणि ८८ नुसार चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप केल्याचे स्पष्ट झाले होते. संचालक मंडळाच्या सदस्यांनी स्वतःच्या संस्थांना कर्ज घेतले; मात्र त्या कर्जाची परतफेड केली नसल्याने बँक अडचणीत आल्याचा ठपका या चौकशी अहवालत ठेवण्यात आला होता.
0 Comments