Hot Posts

6/recent/ticker-posts

मारकडवाडीतील फेरमतदान प्रक्रिया स्थगित

 मारकडवाडीतील फेरमतदान प्रक्रिया स्थगित




ईव्हीएममधील फेरफार पुराव्यानिशी सिद्ध करू, उत्तम जानकरांचा इशारा

माळशिरस (कटूसत्य वृत्त):- ईव्हीएमवर झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत माळशिरस विधानसभा मतदासंघातील मारकडवाडीत आज मंगळवारी (ता. 03 डिसेंबर) फेरनिवडणूक घेण्यात येणार होती. पण प्रशासनाच्या दबावानंतर आता ही फेरनिवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे या मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी गावकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर घेतला आहे. मारकडवाडीत आज सकाळी 08 वाजता मतदानाला सुरुवात होणार होती. परंतु, प्रशासनाकडून जमावबंदीसाठीचे कलम 144 लागू करण्यात आल्याने अखेरीस जानकरांनी आंदोलन स्थगित केले आहे. परंतु, येणाऱ्या काही दिवसांमध्ये कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही, असे जानकरांकडून प्रसार माध्यमांसमोर सांगण्यात आले आहे.

मारकडवाडीमध्ये सकाळी 08 वाजता सुरू होणारी फेरमतदान प्रक्रिया उशिराने सुरू करण्यात आली. परंतु, त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी ग्रामस्थांना एका बाजूला थांबवून ठेवत मतदान प्रक्रिया सुरू करण्यात येणार नाही, असे म्हटले होते. परंतु, तरी देखील गावकरी माघार घेण्यास तयार नसल्याचे पाहायला ज्यानंतर पोलिसांकडून ग्रामस्थांना इशारा देण्यात आला. याबाबत आमदार उत्तम जानकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, आम्ही पोलिसांसोबत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यासाठी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, तुम्ही एक मतदान केले तरी आम्ही मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करू. आम्ही अगोदरच 144 कलम लागू केले आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी जानकरांना सांगितले.

तसेच, आपण ग्रामस्थांशी चर्चा केल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले की, जर पोलीस मतदान करू देणार नसतील तर काय फायदा? आपण पेट्या धरून ठेवणार, ते हिसकावणार, त्यामुळे गोंधळ होऊन झटापट उडेल. यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून जातील, असे ग्रामस्थांचे म्हणणे पडले. त्यामुळे तुर्तास आम्ही ही मतदानप्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे उत्तम जानकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर, मारकडवाडी गावात 1500 च्या आसपास मतदान झाल्याशिवाय निकाल येणार नाही. या गावात मला मतदान होणार होते. मात्र, आता पोलीस बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याला विरोध करत आहेत. आता आम्ही मोर्चा काढून हा मुद्दा प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू. पण मी न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही, असेही जानकर यांनी म्हटले आहे.


'दाल मे कुछ काला है'; मारकडवाडी प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

मारकडवाडीच्या लोकांना लोकशाही काय असते, हे भाजपला दाखवून द्यायचे होते. आणि त्यासाठी 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होण्याऐवजी 'दाल मे कुछ काला है', असे वातावरण त्या ठिकाणी करण्यात आले. सरकारने आणि प्रशासनाने का एवढा पोलीस फौजफाटा पाठवून मतदान करू दिले नाही. सरकारने लोकशाहीचा प्रामाणिक प्रयत्न हाणून पाडला असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.



"मारकडवाडीत अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे." - नाना पटोले
मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे ईव्हीएम आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. 'कर नाही तर डर कशाला?' याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते, पण भाजपा सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना 'वरून' आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली. मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून आहे.

'मारकडवाडीच्या ग्रामस्थांना सलाम ! हुकूमशाही भित्री असते. बुळगी असते. फक्त तिच्यावर चाल करुन जायला असे निधड्या छातीचे, ताठ कण्याचे, सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपूत्र लागतात. भले ते हुकूमशहांच्या 'सो कॉल्ड' महाशक्तीपुढे संख्येनं कमी असतील... पण ते या शैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात.'आमच्या गांवातनं भाजपाला ऐंशी टक्के मतदान होऊच शकत नाही. इव्हीएम मशिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आहे. भलेही आमचा उमेदवार जिंकूदेत... पण आमच्या गांवातनं त्याला कमी झालेले मतदान हा आमच्या खुद्दारीवर लागलेला कलंक आहे.. आमचे गांव गद्दारी करणार नाही आणि गद्दारांना साथ देणार नाही.' ही अस्वस्थता त्यांचं मन खाऊ लागली... शेवटी सगळ्या गांवानं ठरवलं की आपल्यापुरतं बॅलेट पेपरवर मतदान घेऊया. किमान आपल्या काळजाला लागलेली टोचणी तरी थांबेल.'- किरण माने

Reactions

Post a Comment

0 Comments