विविध प्रश्नांबाबत मोहिते पाटील यांनी दिले नितीन गडकरी यांना निवेदन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माढा लोकसभा मतदारसंघातील रस्ते विकास व दळणवळणाच्या विविध प्रश्नांबाबत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भेट घेतली व निवेदन दिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केलेल्या प्रमुख मागणी अशा आहेत, पुणे-सोलापूर NH-65 वरील शिराळ फाटा, वेणगाव फाटा, जुना शिराळ रस्ता (टेंभुर्णी बायपास) येथे अंडरपास व शिराळ ते वेणगाव दरम्यान सर्व्हिस रोडचे निर्माण करावे. तसेच NH561A टेंभुर्णी-करमाळा-जातेंगाव रस्त्याचा DPR नुकताच प्रकाशित झाला आहे. तथापि, या DPR मध्ये मौजे अकोले (खुर्द), तालुका माढा येथील अंडरपास अकोले गावाकडे जाणाऱ्या रस्त्याशी जोडण्याऐवजी कन्हेरगाव रस्त्याशी जोडलेला दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे अंडरपास 135+598 च्या साखळीवर बांधण्याऐवजी 135+300 येथे बांधण्यात यावा व त्याची लांबी कमी करण्यात यावी.
तसेच, DPR मध्ये टेंभुर्णी येथे पुणे-सोलापूर महामार्गाखालील अंडरपास ते महामार्गास जोडणाऱ्या उड्डाणपुलाऐवजी, टेंभुर्णी-करमाळा-जातेंगाव रस्ता पुणे-सोलापूर महामार्गाशी जमिनीच्या पातळीवर जोडणारा रस्ता तयार करण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.मागण्या विचारात घेऊन सुधारित DPR मध्ये समाविष्ट कराव्यात अशी विनंती केली.तर तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. 965) वरील सध्या बांधकाम चालू असलेल्या पुलामुळे ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गावाचा विस्तार असून, शाळा, महाविद्यालये, शेती क्षेत्र, बागायती वाहतूक व दैनंदिन रहदारीसाठी पुलाची उंची व रुंदी अपुरी आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व अपघात टाळण्यासाठी मोठा 'Y' आकाराचा उड्डाणपूल आवश्यक आहे. सध्याचे अपूर्ण व अयोग्य रचना असलेले पुलाचे काम ग्रामस्थांच्या जिवितासाठी धोकादायक असून, भविष्यातील जिवितहानी टाळण्यासाठी काम तातडीने थांबवून योग्य पर्यायांचा अवलंब व्हावा व तरडगाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार सरकारने NHAI सोबत चर्चा करून तांत्रिकदृष्ट्या सक्षम व वाहतुकीस सोयीचा पूल बांधावा, अशी मागणी केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवते खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील रस्ते व दळणवळणा संदर्भातील प्रश्नांबाबत विविध प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन दिले. यावेळेस गडकरी यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
0 Comments