5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करा, अन्यथा सामुदायिक उपोषण
जरांगे पाटलांचं सरकारला नवं अल्टिमेटम
जालना (कटूसत्य वृत्त):- राज्यात नव्या सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
या सर्व घडामोडींदरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरसावले आहेत. शपथविधी होताच त्यांनी पुन्हा सरकारला अल्टिमेटम देत आमरण उपोषणाचा इशारा दिलाय.
जालन्यामध्ये माध्यमांसोबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आहे. सरकारमधील तिघेही जुने पुन्हा नव्याने आले आहेत. दीड वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे, त्यांना तो नवीन नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी 5 जानेवारीपर्यंत पूर्ण करावी, नाही तर अंतरवाली सराटीमध्ये कोट्यवधी मराठा समाज सामुदायिक उपोषणासाठी येईल, असा मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिलेला आहे.
मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले की, मराठा समाजामध्ये गोरगरीब लोक असून समाजाला आरक्षणाची गरज आहे. मागील दीड वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. सरकारमध्ये केवळ खांदेपालट झालीय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जुने आहेत. त्यामुळे सरकारला आरक्षणविषयी नवीन निवेदन देण्याची गरज नाही. सगेसोयऱ्यांची व्याख्या परत सांगण्याची गरज नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलीय. सरकार स्थापन केल्यानंतर आता मंत्रिमंडळ स्थापन होईल. त्यानंतर जर मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय न घेतल्यास अंतरवाली सराटीत उपोषणाची तारीख जाहीर केली जाईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे राज्याचं पालकत्व आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला 5 जानेवारीपर्यंतचा वेळ आहे. जर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला नाही तर, अंतरवाली सराटीत सामुदायिक बेमुदत उपोषण केलं जाईल, असा मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय. आंदोलनाची तारीख जाहीर झाल्यानंतर अंतरवाली सराटीत लाखांत नाही तर कोट्यवधीत मराठा समाज एकत्र येईल, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. त्याचप्रमाणे जरांगे म्हणाले की, समाज माझ्यासोबत आहे. कोणी कितीही आरोप केले तरी फरक पडत नाही
0 Comments