‘दक्षिण’च्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’
अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या संकल्पपत्राचे प्रकाशन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागासह सोलापूर दक्षिण मतदारसंघातील जुळे सोलापूर, हद्दवाढ भाग, नई जिंदगी, नीलम नगर, सलगर वस्तीसह नवीन आरटीओ ऑफिस परिसरातील नागरिकांना भेडसावणार्या पाणी, ड्रेनेज, रस्ते आणि आरोग्य सुविधा या मूलभूत समस्या सोडविण्यासह सोलापूर दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प हाच आपला जाहीरनामा असल्याचे धर्मराज काडादी यांनी सांगितले.
शुक्रवारी, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या साक्षीने सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार, सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या संकल्प पत्राचे (जाहीरनामा) प्रकाशन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीप माने, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, जिल्हा दूध संघाचे संचालक तथा जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती अशोक देवकते, कारखान्याचे व्हाइस चेअरमन सिद्धाराम चाकोते, संचालक शिवानंद पाटील, राधाकृष्ण पाटील, शिवशरण दिंडोरे, लक्ष्मण झळकी, अनिल काळे, नागेश बिराजदार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या सर्वांगीण विकासाच्या या संकल्पपत्रात रस्ते व वाहतूक विकास संकल्प, तालुक्यातील शेतकर्यांच्या व औद्योगिक उन्नतीसाठीचा संकल्प, वीज वितरणाचा संकल्प, शिक्षण विकास, ड्रेनेज लाइन, धार्मिक विकास संकल्पाचा प्रामुख्याने समावेश आहे.
----संकल्प पत्रातील प्रमुख बाबी----
जल योजना संकल्प
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण हे वरदायी असून या धरणाचा टेलएन्डचा भाग म्हणजे दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व उत्तर सोलापूर व शहर या भागात अजूनही कॅनॉलद्वारे पाणी आलेले नाही. यासाठी विधानसभेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठीच्या योजना आणि उजनी अंतर्गत शेतकर्यांना वेळोवेळी शेतीसाठी पाणीपुरवठा करणार्या विविध योजना राबवून सर्वसामान्य जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यस्तरीय प्रयत्न करणे, वडापूर, टाकळी, बंदलगी येथील सीना-भीमा नदीवर नवीन बॅरेजेस बसविणे, सीना-भीमा या दोन्ही नदीवरील जुन्या बंधार्यांची दुरुस्ती, सीना-भीमा नदी जोड कालवा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विधानसभेत प्रश्न मांडून त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणे, बर्याच वर्षांपासून मंद्रूप या गावाला तालुका करण्याची ग्रामस्थांची मागणी असल्यामुळे, मंद्रूपला औद्योगिक केंद्र करण्याचा प्रयत्न करणे. मंद्रूप, निंबर्गी तलावाचे सुशोभीकरण करून पर्यटनस्थळ म्हणून सदरचा भाग घोषित व्हावा यासाठी योजना राबवण्याचा संकल्प आहे.
सोलापुरातील उच्चविद्याविभूषित तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सोलापुरात लघू उद्योग, कुटीर उद्योग, कारखाने, आयटी पार्क निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच विडी कामगार व यंत्रमाग कामगार यांच्या समस्या सोडवून त्यांचे जीवनमान उंचावणे, मुस्लीम, मराठा, धनगर, महादेव कोळी, लमाण, बंजारा, लिंगायत व बहुजन समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे. तसेच या समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृह उभारणीसाठी प्रयत्न करणे, मुस्लीम समाजासाठी स्वतंत्र वाचनालयाची स्थापना करून उर्दू भाषेचे जतन व संवर्धन करण्यास सहाय करण्याचा संकल्प या संकल्पपत्रात करण्यात आला आहे.
0 Comments