Hot Posts

6/recent/ticker-posts

साधंसुध पाडायचं नाही,सगळ्याचा नाद करायचा पण.; शरद पवारांची तुफान राजकीय टोलेबाजी

साधंसुध पाडायचं नाही,सगळ्याचा नाद करायचा पण.; शरद पवारांची तुफान राजकीय टोलेबाजी



माढा (कटूसत्य वृत्त):- राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी असून त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या शरद पवार हे स्वतः मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरु असून त्यांनी आता माढा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. तसेच पक्षाची साथ सोडून गेलेल्या नेत्यांवर टीकास्त्र डागले.
माढा विधानसभा मतदारसंघामध्ये पार पडलेल्या सभेमध्ये जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, "पक्ष फाटाफुटीत काळात आमची जवळची विश्वासू माणसं लांब गेली पण अभिजित पाटील यांनी येऊन सांगितले की कोणी कुठे ही जावो पण मी तुमची साथ सोडणार नाही. पण हा आमचा माढ्यातील गडी कुठं पळून गेला कळलंच नाही. नंतर समजले की ईडीच्या भितीने तो गेला. मलाही ईडीची नोटीस आली होती. पण मी कुठं पळून गेलो का. मी थेट ईडीच्या ऑफीसकडे जायला निघालो त्यावेळी ईडीच्या अधिकारी ऑफिसकडे येऊ नका असे म्हणत मला हात जोडतात आणि आमचा हा गडी ईडीची नोटीस मिळताच कुठे पळून गेला याचा पत्ता सुद्धा लागला नाही. संकटाला तोंड देण्याची हिम्मत यांच्यामध्ये नाही.ज्यांचे हात स्वच्छ आहेत त्यांना कोणाच्या बापाची भीती नसते," अशा शब्दात शरद पवार यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
पुढे शरद पवार म्हणाले की, "माढा तालुक्यात ज्यांना इतके दिवस साथ दिली त्यांच काय करायचं. एकदा रस्ता चुकलेल्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. उद्याच्या निवडणुकीत साधंसुध पाडायचं नाही जोरात पाडायचे याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे. सगळ्यांचा नाद करायचा पण असे म्हणताच उपस्थित जनसमुदायातून आवाज आला पवार साहेबांचा नाय!" शरद पवार हे माढा, करमाळा, पंढरपुर, माळशिरस, मोहोळ येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथील सभेत बोलत होते.
सोलापूरमध्ये शरद पवारांचा पुतळा
सोलापूरमध्ये शरद पवार यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघात उपळवाटे गावात शरद पवार यांचा 83 फूट उंच पुतळा उभा करण्यात येणार आहे. 83 वर्षीय शरद पवार यांचा प्रचारसभेतील दांडगा उत्साह पाहून जनशक्ती शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते अतुल खुपसे हे हा पुतळा उभा करणार आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवशी या पुतळ्याचे काम सुरु करणार आहे.

 

Reactions

Post a Comment

0 Comments