अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ
तीर्थक्षेत्र विकास, देगाव एक्स्प्रेस योजनेला हवे प्राधान्य
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- नूतन आ.कल्याणशेट्टी यांच्याकडून तालुकावासियांच्या अपेक्षा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी अक्कलकोट मतदारसंघातून भाजपकडून आ. सचिन कल्याणशेट्टी हे विक्रमी मतांनी निवडून आल्याने तालुकावासीयांच्या अपेक्षा आता आणखीनच वाढल्या आहेत. महत्त्वाकांक्षी चारशे कोटींची देगाव एक्स्प्रेस योजना, तीन शहरांची पाणीपुरवठा योजना, याशिवाय तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम आदी बाबी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. याकडे नूतन आमदारांनी प्राधान्य द्यावे, अशी मागणी समोर येत आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विकासाच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. यातच अक्कलकोटला मंत्रिपदाची लॉटरी लागल्यास तालुक्याचा विकास आणखी गतिमान होणार आहे. गेल्या अडीच वर्षांत बऱ्यापैकी रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत.अजूनही अनेक रस्ते आहेत, ते या पाच वर्षांत पूर्ण होतील. यात मागच्या काळात एकरुख उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाली. या योजनेच्या लाभक्षेत्रातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील चौदा गावे अजून तहानलेली आहेत. त्याचा पाठपुरावा व्हावा. एकरुखमुळे कुरनूर धरणाखालच्या शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ झाला. पण बोरी नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती किंवा नव्याने बंधारे बांधून जास्तीत जास्त सिंचन क्षेत्र कसे ओलिताखाली येईल, हे पाहणे गरजेचे आहे. याशिवाय बहुचर्चित देगाव एक्स्प्रेस योजना प्रगतिपथावर आहे. ती पूर्णत्वास नेऊन दक्षिण भागातील शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळणे गरजेचे आहे. यावेळी केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने निधी मिळण्यास आणि काम पूर्ण होण्यास काही अडचण येणार नाही. अक्कलकोटमध्ये व उद्योगधंदे नाहीत. औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. अक्कलकोट तालुका हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेला आहे. त्यामुळे टेल एन्ड म्हणून या तालुक्याकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र गेल्या पंचवार्षिकमध्ये मोठ्या प्रमाणात निधी येऊन विकासाला सुरुवात झाली आहे. २९ कोटींचे अक्कलकोट बस स्टँडचे काम सुरू झाले आहे. ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराचा जीर्णोद्धारही सुरू आहे. नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीला मंजुरी मिळाली आहे. न्यायालयाच्या इमारतीला मंजुरी मिळाली आहे. शहरात नवीन दुय्यम निबंधक कार्यालय होत आहे. दुधनी, अक्कलकोट, मैंदर्गी या तीन नगर परिषदेसाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात निधी देखील मिळाला आहे. या सर्व योजनांची कामे लवकर पूर्ण होऊन ती मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. सध्या शहरामध्ये नगर परिषदेची प्रशासकीय इमारत सुद्धा अद्ययावत करण्याची गरज आहे. मध्यंतरी तसा प्रस्ताव आला होता. पण तो बारगळला. या इमारतीसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हुतात्मा स्मृती मंदिरच्या धर्तीवर सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून अक्कलकोट शहराला सांस्कृतिक कार्यक्रमाचे वैभव प्राप्त होऊ शकेल. यासाठी ए-वन चौकात नगर परिषदेच्या समोर जागा आहे. अक्कलकोट शहरात खेळासाठी फत्तेसिंह मैदान एकच आहे. त्याव्यतिरिक्त आणखी दोन मैदानांची शहराला गरज आहे. त्यादृष्टीने पावले टाकणे गरजेचे आहे. नळदुर्ग ते अक्कलकोट या रस्त्याचे काम अर्धवट आहे. ते पूर्ण करण्याचे आव्हान आहे. अक्कलकोट ते स्टेशन रस्ता चौपदरी व्हावा. तालुक्यात आरोग्याच्या बाबतीत अव आहेत. उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. त्याचे काम तत्काळ होण्याची गरज आहे. अक्कलकोट ट्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची आवश्यकता आहे.
0 Comments