आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे
( कटूसत्य वृत्त ):- इतिहास म्हणजे भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची नोंद असते. त्या इतिहासाचा वर्तमानकाळात उपयोग होतो का? यासाठी आपण इतिहासाची पाने चाळत असतो. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अनेक व्यक्तींचे योगदान मोलाचे ठरले. त्यापैकी काहींच्या नावांची पारायणे झाली,तर काही कायम अनामिक राहिले. त्यापैकी क्रांतिगुरू लहुजी साळवे हे एक होय. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या 'पेठ'या गावी झाला.
लहुजी साळवे यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात सेवेने, निष्ठेने चाकरी करत होते. त्यांच्या कामावर छत्रपती शिवाजी महाराज खूश झाले आणि त्यांनी साळवे घराण्याला 'राऊत' ही पदवी बहाल केली. साळवे कुटुंबाचे मूळपुरुष लहुजी हे होते. आजोबाचे नाव नातवाला देण्याच्या परंपरेतून लहुजींचे वडील राघोजी आणि आई विठाबाई (गयाबाई ) यांनी आपल्या पुत्राचे नाव लहुजी ठेवले.
लहुजींचे वडील राघोजी साळवे यांचे शौर्य, कर्तबगारी व वन्यपशूंविषयीचे ज्ञान पाहून दुसरा बाजीराव पेशवे याने त्यांच्याकडे १८०६ मध्ये पुण्यातील शिकारखाण्याची जबाबदारी सोपवली होती. पुढे त्यांच्याकडे शस्त्रागाराचीही जबाबदारी संपवण्यात आली.या घटनेनंतर साळवे कुटुंब पुण्यात दाखल झाले. गंज पेठेत हे कुटुंब वास्तव करू लागले. १८१७ मध्ये इंग्रज-मराठा युद्ध खडकी येथे झाले. त्यावेळी पेशव्यांचा सरसेनापती बापू गोखले होता. या युद्धात राघोजी साळवे धारातीर्थी पडले. 'जोपर्यंत या देशातून इंग्रजांची सत्ता नेस्तेनाबूत करणार नाही, तोपर्यंत स्वस्त बसणार नाही 'अशी प्रतिज्ञा लहुजींनी घेतली. राघोजी साळवे यांची समाधी मुंबई- पुणे महामार्गावर वाकडेवाडी जवळ असून ती 'मांगीर बाबा' समाधी म्हणून ओळखली जाते. आजही मातंग समाजातील राघोजी साळवे वर श्रद्धा असणारे लोक अभिवादन करण्यासाठी दरवर्षी मांगीर बाबा च्या समाधीपाशी जमतात.
लहुजीनी यापुढे 'जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी' हा निर्धार केला. 'बलवान व्हा आणि स्वराज्य मिळवा ' ही त्यांची घोषणा त्या काळातील अनेक तरुणांना त्यांच्या आखाड्याकडे आकर्षित करत होती. ऑक्टोबर १८२२ मध्ये पुणे येथील पुनवडीच्या परिसरात मल्लविद्याची तालीम त्यांनी स्थापन केली. या तालमीमध्ये दांडपट्टा, घोडेस्वारी, बंदूक चालवणे, गुदगुदा, गोफण ही शस्त्रे चालवणे याबरोबरच नदीवर पोहणे, पोटाने भिंत चढणे इत्यादीचा समावेश त्यांच्या आखाड्यातील शिक्षणात होता. या कार्यास त्यांना रानबा गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. लहुजी साळवे यांनी तालमीतील तरुणांना मल्लविद्याचे शिक्षण दिले.त्याचप्रमाणे जातीयता अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सामाजिक समतेचेही धडे दिले. त्यामुळे त्यांच्या तालमीत शिक्षण घेतलेल्या अनेक तरुणांनी क्रांतिकारी कार्याबरोबरच समाजसेवेचेही कार्य केले. त्यात रानबा गायकवाड, भागोजी नाईक, राघोजी नाईक, जोतीराव फुले, सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, उस्मान शेख, तात्या टोपे, रंगो बापू, बाबिया, योरीया, दौलतराव नाईक, धर्मा, गणू शिवाजी साळवे, धुराजी, आपाजी, वासुदेव बळवंत फडके इत्यादी लहुजी साळवे यांचे अनेक शिष्य दिसतात. लहुजी साळवे यांनी १८२२ ते १८४८ या काळात अत्यंत गुप्त पद्धतीने तरुणांना लष्करी शिक्षण देऊन भारतीय स्वतंत्र आंदोलनात क्रांतिकारकांची फौज त्यांनी तयार केली. १८५७ च्या उठावात लहुजी साळवे यांच्या शिष्यांनी नानासाहेब पिशवी, तात्या टोपे व रंगो बापूजी यांच्या सैन्यात सामील होऊन सातारा, मिरज, कानपूर, झाशी या ठिकाणी उठाव केले. सातारच्या झेंडा मैदानावर ७ डिसेंबर १८५७ रोजी फाशीवर चढवण्यात आलेले बाबीया, योरिया, नाथ्या, यल्या, मलय्या या मातंग क्रांतिकारकानी लहुजी साळवे यांच्याकडून लष्करी शिक्षण घेतले होते.१८५७ च्या सुमारास पुण्यातील ब्रिटिश अधिकाऱ्यांना लहुजी साळवे यांच्या क्रांतिकारी कार्याबद्दल संशय आला होता. त्यांनी लहुजी साळवे यांच्या तालमीवर धाड घातली, परंतु अगोदरच याची पूर्वकल्पना लहुजींना मिळाल्यामुळे सर्व शस्त्रास्त्रे तालमीतील त्यांच्या शिष्यांनी जमिनीत पुरून ठेवली. त्यामुळे ब्रिटिशांना लहुजींच्या तालमीत कोणताही पुरावा मिळू शकला नाही.
१८४८ ते १८८१ हा लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनातील दुसरा अध्याय होता. जो त्यांनी सामाजिक विषमता, अनिष्ट प्रथा, पुरोहितशाही, अन्याय-अत्याचारी जातीय व्यवस्था, समाजातील वाईट परंपरा, बालविवाह पद्धती नष्ट करणे, विधवा विवाह बंदी उठवणे, अस्पृश्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे, त्याचप्रमाणे अस्पृश्यांना शिक्षण, स्त्री शिक्षण व शिक्षणाचा प्रसार या कामात खर्ची घातला. गुरुजी लहुजीबुवा यांच्या तालमीत दयाळू इंग्रज सरकारला पालथे घालण्यासाठी, दांडपट्ट्याची व निशान मारण्याची कसरत करण्यासाठी प्रवेश केल्याबद्दल 'गुलामगिरी' ग्रंथात महात्मा ज्योतिराव फुले यांनी विचार व्यक्त केले आहेत. समाजकंटकांनी जोतीरावांना ठार मारण्यासाठी गुंड पाठवले होते, परंतु हा हल्ला लहुजी साळवे यांच्या निष्ठावंत शिष्यांनी उधळून लावला. नंतरच्या काळात जोतिराव व सावित्रीबाईंच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून लहुजी साळवे यांनी आपल्या तालमीतील शिष्यांचे जागते पहारे ठेवले होते. २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. स्थापनेच्या प्रसंगी ६० व्यक्तींनी सर्वप्रथम तळ भंडारे उचलून सत्यशोधक समाजाचे सदस्यत्व स्वीकारले होते. त्यात लहुजी साळवे व त्यांच्या तालमीतील अनेक शिष्यांचा समावेश होता.
महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत आपली पुतणी सत्यशोधक मुक्ता साळवे हिला लहुजींनी प्रवेशित केले. मुक्ता साळवे हिने चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असताना जो निबंध लिहिला तो 'ज्ञानोदय' या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला होता. या निबंधात मुक्ताने प्रस्थापित धर्म व्यवस्थेतील अनाचार, विषमता, दांभिकपणा उघड केला. आमच्या अस्पृश्यांचा धर्म कोणता? असा प्रश्न निबंधात उपस्थित केला.
मुक्ता साळवे हिने लिहलेला निबंध म्हणजे लहुजी साळवे यांच्या संस्काराचे लिखित रूप आहे असेच म्हणावे लागेल.लहुजी साळवे यांनी १८७६ ते १८७८ या काळातील भीषण दुष्काळात पुण्यातील गंजपेठ या ठिकाणी अन्नछत्र सुरू करून आपल्या अस्पृश्य बांधवांची सेवा केली होती. हे अन्नछत्र सुरू करण्यासाठी त्यांना पुण्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी मदत केली होती.
वयाच्या ८७ व्या वर्षी दि. १७ फेब्रुवारी १८८१ रोजी सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे यांचा मृत्यू झाला. संगमवाडी, पुणे येथे त्यांची समाधी आहे.
आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे शिक्षणाची कास धरली पाहिजे, जातिवाद, धर्मभोळेपणा याला मुठमाती देऊन देश कार्याला वाहून घेतले पाहिजे हा निर्धार त्यांच्या जयंतीदिनी आपण करूया...
0 Comments