निवडणूक यंत्रणांनी पुढील दोन दिवस खर्चाच्या अनुषंगाने कठोर कारवाई करावी
- विशेष खर्च निरीक्षक बी आर बालकृष्णनसोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया होत आहे. या अनुषंगाने पुढील दोन दिवस सर्व निवडणूक यंत्रणांनी उमेदवाराच्या खर्चाच्या अनुषंगाने तसेच अवैध दारू, रोख रक्कम व अन्य अनुषंगिक बाबीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून कठोर कारवाई करावी, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी दिले.
भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरिक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी सोलापूर, धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांतील निवडणूक खर्च अनुषंगिक यंत्रणांचा आढावा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यलय येथे घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खर्च निरिक्षक मीना तेजराम श्रीमनलाल(IRS) , खर्च निरिक्षक श्रीमती बी. ज्योती किरण (IRS), पोलीस आयुक्त एम. राजकुमार , उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, खर्च नोडल यांच्यासह आयकर विभाग, सेवा कर, राज्य उत्पादन शुल्क यासह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. बालकृष्णन पुढे म्हणाले की, राज्यात निवडणूक काळात शेवटच्या काही तासांमधील प्रचारात गैर मार्गाने मतदारांना पैसे किंवा वस्तू वाटपाची तक्रार सी-व्हिजील, 1950 टोल फ्री क्रमांकावर मिळाल्यास त्यावर अत्यंत गतिमान पद्धतीने कार्यवाही करावी. तसेच या दोन्ही तक्रारीसाठी असणाऱ्या सुविधांबाबत नागरिकांनी सजग राहून मतदान प्रक्रिया पारदर्शक व न्याय वातावरणात पार पाडवी . सोशल मीडियावर जर कोणी अशा चुकिच्या प्रक्रियेचे व्हिडिओ पोस्ट केले तरी तो संदर्भ घेवून त्या ठिकाणी भरारी पथक पाठवा. पेड न्यूजबाबतही या काळात चांगल्या प्रकारे तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मतदानपूर्व 48 तासात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी याकाळात वस्तू खरेदी, ऑनलाईन ट्रांजेक्शन, अवैध मद्य वाहतूक व खरेदी यासह रोख रक्कम वाहतूक याबाबत होणाऱ्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवा अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरिक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी दिल्या. सोलापूर जिल्हयाला आंध्र प्रदेश व कर्नाटक येथून येणाऱ्या अवैध मद्य वाहतुकोबाबत सीमेवरील यंत्रणेने लक्ष ठेवून ती सोलापूर शहरात दाखल होणारच नाही याची काळजी घ्यावी. सीमांवरील सर्व पथकांनी संशयित वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश विशेष खर्च निरिक्षक बी.आर. बालकृष्णन यांनी दिले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक काळात खर्चाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची अत्यंत सविस्तर माहिती दिली. पोलीस शहर आयुक्त राजकुमार यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत निवडणूक काळात करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देऊन त्यामध्ये 21 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे सांगून आदर्श आचारसंहिता भंगाच्या 14 तक्रारी अनुषंगाने गुन्हे दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीत एक कोटी 28 लाखाची अवैध दारू साठा जप्त केल्याचे सांगून निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments