मतदारसंघातील विकासासाठी आचारसंहिता लागेपर्यंत कोट्यवधींचा निधी आणला- आ.यशवंत माने
मोहोळ (कटूसत्यवृत्त):-मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी आचारसंहिता लागेपर्यंत कोट्यवधींचा निधी आणला. देवडीसाठी दहा कोटी दिले. अनगर व दहा गावांच्या पाणीपुरवठा योजनेत संपूर्ण देवडी गावचा समावेश केला. एवढा विरोधकांना पुळका होता तर देवडीचा आष्टी उपसा सिंचन योजनेत का समावेश केला नाही? दहा गावांचे पालकत्व माजी आमदार राजन - पाटील यांनी स्वीकारल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार यशवंत माने यांनी केले. देवडी (ता. मोहोळ) येथे -प्रचारासाठी आमदार माने आले असता त्यांनी विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी देवडी, वाफळे, सिद्धेवाडी, कुरणवाडी, आष्टी या गावांचा प्रचार दौरा केला. आमदार माने म्हणाले, अनगर व दहा गावे उपसा सिंचन योजनेचा तीन वर्षे पाठपुरावा केला. खास बाब म्हणून ही योजना केली. देवडीसह वाफळे गावाचाही या योजनेत समावेश केला आहे. पाणी पुरवठ्यासह या गावातील पाझर तलावही भरून घेण्याची सोय असणारी ही एकमेव योजना आहे. या योजनेमुळे १८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पुढील ३५ वर्षांचे नियोजन करून शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यासाठी नऊ विद्युत उपकेंद्रे मंजूर करून आणली आहेत.
यावेळी माजी आमदार राजन पाटील म्हणाले, सत्तेपेक्षा पिढ्यान्पिढ्या आमच्या पाठीशी असणाऱ्यांचे आम्हाला ऋण फेडावयाचे आहे. निवडणूक आमदार माने यांची, विरोधक मात्र टीका आमच्यावर करतात. संकुचित वृत्तीची ही मंडळी आहेत यांच्यापासून सावध राहा.
यावेळी तानाजी थोरात, संतोष जाधव, संजीव खिलारे, अण्णासाहेब पाटोळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी दिनकर थोरात, सरपंच वैभव कांबळे, चंद्रहार चव्हाण, मारुती पाटील, मदन पाटील, नागनाथ तळेकर, दीपक थोरात, सज्जन पाटील, सज्जन थोरात, बाबासाहेब थोरात आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments