"मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले"
जालना (वृत्त सेवा) :- मराठा, मुस्लीम, दलित (एमएमडी) मतांचे समीकरण जुळवण्यासाठी अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत मराठा, मुस्लीम, दलित समीकरणावर एकमत झाले आहे.
ही विधानसभा निवडणूक लढवायची, असा निर्णय घेण्यात आला असून कोणत्या जागा लढायच्या आणि कोणते उमेदवार द्यायचे, याबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यातच मुस्लीम धर्मोपदेशक, मौलाना सज्जाद नोमानी यांनी मनोज जरांगे यांचे तोंडभरून कौतुक केले.
मतदारसंघात इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. आता ३ नोव्हेंबरला कोणत्या जागी कोणता उमेदवार द्यायचे हे ठरवले जाईल. एक उमेदवार निवडला जाईल. इतरांनी अर्ज मागे घेत स्टार प्रचारक म्हणून काम करायचे, असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. तसेच मराठा समाजाला मी एकत्र केले आहे. आता मुस्लिम आणि दलित समाजदेखील सोबत आला आहे. यामुळे समीकरण जुळले आहे. आम्ही सोबत आल्याने बदल घडेल, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे यांनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करणार
धर्मात फूट पाडणारे सत्तेमध्ये आहेत. त्यांनी महाराष्ट्राची राजधानी गुजरात स्थानांतरित केली आहे. संघ परिवार आणि त्यांचे एजंट धर्माचे नाव घेऊन भांडण लावत आहेत. सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. ही शरमेची बाब असल्याचे सज्जाद नोमानी यांनी सांगितले. आम्ही विचारपूर्वक प्रत्येक मतदार- संघात मनोज जरांगे यांनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे नोमानी म्हणाले.
माझ्या शेजारी मनोज जरांगे पाटील बसलेत. मी स्वतः एक फकीर आहे. ते देखील फकीर आहेत. दोन फकीरांचा संगम झाला आहे. मनोज जरांगे यांनी भारतभर फिरावे. मनोज जरांगेंच्या रुपात एक मोठा नेता या महाराष्ट्रात उदयास आला आहे. त्यांनी एक मोठे आदोलन उभे केले. त्यांच्या आंदोलनाची माहिती घेतली. तेव्हा जाणवले की, आपल्या देशाला नवे महात्मा गांधी मिळाले आहेत, नवे आंबेडकर मिळाले आहेत. मनोज जरांगेंच्या रुपात आपल्याला नवे मौलाना अबुल कलाम आझाद मिळाले आहेत. मनोज जरांगे देशाला नव्या उंचीवर पोहोचवतील यात शंका वाटत नाही, या शब्दांत नोमानी यांनी मनोज जरांगे यांचे कौतुक केले.
दरम्यान, आमची सहन करण्याची क्षमता आता संपली आहे. आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे. आम्हाला अन्यायाचे संकट परतून लावायचे आहे. आम्हाला संपवायला निघालेल्यांना संपवण्याची वेळ आलेली आहे. मराठा समाजाने जे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न आज साकार होणार आहे. आता आमचे समीकरण पक्के झाले असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
0 Comments