विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगरकर १७३ मतदान केंद्रांवर होणार वेबकास्टिंग आणि थेट प्रक्षेपण
पानीव : (कटुसत्य वृत्त)
माळशिरस तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेमध्ये प्रत्येक मतदारास मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. तालुक्यात ३४९५६८ मतदार नोंदणीकृत आहेत. त्यापैकी स्त्री मतदारांची संख्या १६९२१४, तर पुरुष मतदार १८०३२२ आहे. इतर श्रेणीतील मतदारांची संख्या ३२ आहे. २९७३३७ मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय माळशिरस तालुक्यात ३४५ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगरकर यांनी दिली. सुरक्षेसाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी सज्ज झाले आहेत. त्यांच्या समन्वयासाठी नोडल अधिकारी आणि मुख्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ३८० केंद्र अधिकारी आणि ३८० मतदान अधिकारी यांची यंत्रणा तयार आहे. याशिवाय मतदान केंद्रांवर ३९२ शिपाई कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अकलूज येथे सकाळी नऊ वाजता तृतीय प्रशिक्षण व साहित्य वाटप करण्यात येणार असून त्यांना रवाना करण्यासाठी ४६ बसेस आणि ३८ जीप वाहने मतदान कर्मचाऱ्यांसाठी नियुक्त
करण्यात आली आहेत.
मतदारांच्या सोयीसाठी केंद्रांवर पाण्याची व्यवस्था, पाळणाघर, व्हिलचेअर, शौचालय, आवश्यक ते सावलीसाठी मंडप, दिव्यांगांसाठी रॅम्प तसेच वैद्यकीय किटसह प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान झालेली यंत्रे जमा करून घेतल्यावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदामातील सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार आहेत. यावेळी उमेदवार व
त्यांच्या प्रतिनिधींना हजर अस आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील १७३ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार असून त्याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तो निवडणुकीदरम्यान तक्रारी आणि नियंत्रणासाठी कार्यरत असेल. या सर्व तयारीमुळे निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पडून लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदार आपला सहभाग नोंदवतील, अशी अपेक्षा माळशिरस विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगरकर यांनी व्यक्त केली.
विशेष मतदान केंद्रे
मतदान प्रक्रियेस अधिक प्रभावी आणि समतोल बनवण्यासाठी माळशिरस तालुक्यात तीन प्रकारची विशेष मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये पूर्ण महिला केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. हे केंद्र यशवंतनगर (१८२), अकलूज (२४७), माळीनगर (२७३), बागेवाडी (१७७) ही पूर्ण महिला मतदान केंद्रे असणार आहेत तसेच युवा मतदार केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तालुक्यातील भांब (११५, ११६), जळभावी (१६३), आणि सुळेवाडी (२०८) येथे युवकांसाठी विशेष सुविधा आहेत... त्याचप्रमाणे दिव्यांग मतदार केंद्रे करण्यात आली. माळशिरस (१४२) व बागेवाडी (१७७) येथे दिव्यांग मतदारांसाठी केंद्र उपलब्ध करुन दिलेले असून या केंद्रावर विशेष सजावट करण्यात आलेली आहे. पाचपेक्षा अधिक केंद्रे एकाच इमारतीत असलेल्या फोंडशिरस, मळोली, कोळेगाव व खुडूस या गावात २१ स्वयंसेवकांची रांग व्यवस्थापनासाठी करण्यात आलेली आहे. हे केंद्रे मतदारांना लक्षात यावीत यासाठी वेगवेगळ्या रंगांनी केंद्रांना रंगविण्यात आले आहे.
0 Comments