Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रचाराची पातळी खालावू देऊ नका!

 प्रचाराची पातळी खालावू देऊ नका!


  

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आठवड्याभरातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले. असं म्हणतात,'मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते!' परंतु शब्दांचे जेव्हा अपशब्द बनतात, तेव्हा भाषेचा खऱ्या अर्थाने अपमान होतो ; आणि हा अपमान असतो आपल्या मातृभाषेचाच… अमृताच्या पैजा जिंकणारी ही मराठी भाषा महाराष्ट्रातील सर्व स्तरांमध्ये आणि सर्व व्यवहारांमध्ये बोलली जाते.    उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत दर १२ कोसांगणिक बदल करत आपण आपली माय मराठी हजारो वर्षापासून बोलत आलो आहोत. तसं पाहिलं तर प्रत्येक मानवी व्यवहारातील भाषेतील शब्द टोकदार,अंकुचिदार, तिखट, जळजळीत, आदरभाव व्यक्त करणारे, स्नेह,प्रेम वृद्धिगत करणारे, औपचारिक, अनौपचारिक असा अनेक रूपात ऐकवले जातात.  जनमत तयार करण्यासाठी निवडणुकीतील प्रचार काळात उमेदवार,पक्षाचे नेते, कार्यकर्ते भाषणबाजी करून लोकांसमोरआपली विचारधारा, ' व्हिजन ' मांडत असतात ;आणि त्याचवेळी  प्रतिपक्षावर टीका देखील  करत असतात. आपली विचारधारा आणि व्हिजन सांगताना वापरले जाणारे शब्द हे मवाळ, समजूतदारपणाचे आणि मतदारांना भुरळ घालणारे असतात. याउलट विरोधकावरती टीका करताना मात्र कधी कधी   काही नेत्यांची  भाषेची  पातळी खालावली जाते. बोलण्याच्या ओघात  काही वेळा राजकीय नेतेमंडळी नको ते बोलून जातात. राजकीय संघर्षात शब्द हे शस्त्र आहेत ; हे जरी मान्य असले तरी या शस्त्रांचा वापर करण्याचे  काही नियम, परंपरा आणि  नैतिक अधिष्ठानाची पडताळणी राजकीय नेते मंडळींनी केली पाहिजे. काही वेळा समोर बसलेला जनसमुदाय पाहून नेते मंडळींचा तोल जातो. विचार करून बोलण्यापेक्षा,बोलून विचार करत बसण्याची वेळ त्यांच्यावर येते.
    ' प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं!'असं म्हटलं जातं. सत्ता प्राप्त करण्यासाठीच्या या युद्धामध्ये माफ करणारे किंवा शिक्षा करणारे मात्र मतदार असतात याचे भान नेते मंडळींनी ठेवले पाहिजे.महाभारतात  भीम आणि दुर्योधन यांच्या गदायुद्धात श्रीकृष्णाने  खुणेने दुर्योधनाच्या  मांडीवर गदा प्रहार करण्यास भीमाला  सुचवले. युद्धामध्ये कमरेच्या खाली शस्त्राने  प्रहार करणे नियमबाह्य होते, परंतु युद्धात सर्व काही माफ असते या म्हणीला साजेसे असे वर्तन भिमाने केले. दुर्योधनाच्या  मांडीवर आघात करून त्याची मांडी फोडली. दुर्योधन भीमाच्या हातून अखेर मारला गेला.   महाभारतातील या कुटील राजकारणाचा प्रत्यय पुढील काळात   झालेल्या सत्ता संघर्षात पाहायला मिळाला. लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा प्रकारे कमरे खाली शब्द शस्त्राचा हल्ला केला,तर मतदार मात्र नाराज होतात.   निवडणूक प्रचारात  मुद्देसूदपणे आणि  मार्मिकपणे केलेल्या भाषणामुळे मतदारांची मने जिंकता येतात. महाराष्ट्र राज्याचे  पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात  सुसंस्कृत राजकारणाचा पाया रचला.  त्यांच्या भाषणातून त्यांचे सखोल वाचन, मनन आणि चिंतन यांचे प्रतिबिंब पाहावयास मिळायचे. साहित्य, शिक्षण, माणूसकीची उभारणी, श्रमशक्ती, संस्कृती, कृषी, औद्योगिक धोरण, सहकार, विज्ञान, संगीत, शेती, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र धोरण, सामाजिक तत्त्वज्ञान, राजकारण, यांसारख्या असंख्य विषयांत ते विचारपूर्वक व्यक्त होत असत . भाषाप्रभू यशवंतराव हे शब्दांच्या अचूक फेकीने श्रोत्यांच्या मनाचा वेध घेताना दिसायचे . आजच्या काळात मात्र राजकीय नेत्यांच्या   भाषणांचा  स्थळ खालावलेला दिसून येतो.
      कधीकधी वक्ता  काय बोलतो म्हणजेच कोणते मुद्दे मांडतो, यापेक्षा  तो वक्ता   ते मुद्दे कसे मांडतो यावर अधिक लक्ष दिले जाते. निवडणूक प्रचारादरम्यान   भाषण देणाऱ्याची बॉडी लँग्वेज, खंबीरपणा  आणि आत्मविश्वास मतदारांना मत देण्यास प्रवृत्त करत असतो. 
    हृदया हृदय येक जाले। ये हृदयीचे ते हृदयी घातले।द्वैत न मोडता केले। आपणा ऐसे अर्जुना।
 या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी प्रमाणे मतदारांच्या हृदयाला हात घालण्याचे काम प्रचाराच्या दरम्यान  जो नेता  करेल तो निवडणूक जिंकेल अथवा ज्याचा प्रचार करत आहे त्यांना  जिंकून आणतील . याचाच अर्थ  निवडणूक जिंकण्यासाठी प्रचारातील भाषेचा स्तर खालावणे म्हणजेच मतदारांचे हृदय घायाळ करणे होय. म्हणून प्रचारादरम्यान शब्दांची निवड, शब्द फेक आणि  भाषेचा स्तर उच्च ठेवण्याची दक्षता येत्या निवडणूक प्रचार काळात आपले नेते मंडळी घेतील अशी अपेक्षा बाळगूया...
- किशोर जाधव, सोलापूर
- मो. नं. ९९२२८८२५४१

Reactions

Post a Comment

0 Comments