Hot Posts

6/recent/ticker-posts

मोबाईल मिळणार असल्याचे सांगून लाडक्या बहिणींना कार्यक्रमाला आणले वचनपूर्ती सोहळ्याला आणायला १.२० कोटींचा खर्च!

 मोबाईल मिळणार असल्याचे सांगून लाडक्या बहिणींना कार्यक्रमाला आणले वचनपूर्ती सोहळ्याला आणायला १.२० कोटींचा खर्च! 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी गावागावातील महिला लाभार्थींना आणायला सातारा, सांगली, पुण्याच्या बसगाड्या बोलावण्यात आल्या होत्या. ४३५ बसमधून जिल्हाभरातून लाडक्या बहिणी कार्यक्रमासाठी आणण्यात आल्या.

पण, किती बस हाऊसफुल्ल होऊन आल्या, याची माहिती विभाग नियंत्रकांकडे नाही. त्यामुळे लाखोंचा खर्च करून या बसमधून कार्यक्रमाला नेमक्या किती महिला लाभार्थी आल्या, याचा हिशेब गुलदस्त्यातच आहे.एका बसमध्ये ४४ प्रवासी बसतील एवढी क्षमता आहे. तहसीलदारांनी दिलेल्या गावांच्या यादीनुसार बसगाड्या सोमवारी (ता. ७) रात्रीच मुक्कामी गेल्या होत्या. सकाळी नऊ- दहाच्या सुमारास त्या गाड्या संबंधित गावातून महिला लाभार्थींना घेवून सोलापूर शहरातील कार्यक्रमासाठी निघाल्या. काही बसगाड्या वाटेतच बंद पडल्याचे सांगण्यात आले. पण, असे कोठेही झाले नसल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले. दुसरी बाब म्हणजे प्रत्येक बस पूर्ण क्षमतेने भरल्यावरच हलवावी, अशा काही सूचना नव्हत्या. त्यामुळे वेळेत जेवढ्या महिला येतील, त्यांना घेवून अनेक बस आल्याचेही पहायला मिळाले.अनेक गावातून मराठा आरक्षणामुळे बस रिकाम्या तथा मोजक्याच महिलांना घेवूनही आल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे गावागावातील महिला लाभार्थींची यादी तयार करताना अनेकांना स्क्रिन टच मोबाइल मिळणार असल्याचे सांगून कार्यक्रमासाठी आणल्याची चर्चा त्याठिकाणी ऐकायला मिळाली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीतील हा कार्यक्रम नेटका व नियोजनबद्ध पार पडल्याचेही यावेळी पहायला मिळाले.

एसटी गाड्यांसाठी मोजावे लागणार १.२० कोटींचे भाडे

सोलापुरातील वचनपूर्ती सोहळ्याकरिता गावागावातून लाडक्या बहिणींना आणायला ४३५ गाड्यांची सोय करण्यात आली होती. त्यात सातारा, पुणे, सांगलीतून बसगाड्या मागविण्यात आल्या होत्या. त्या अंतरावरून बससाठी भाडे द्यावे लागणार आहे. या सर्व बसगाड्यांचे एकूण अंदाजे भाडे एक कोटी २० लाख रुपयांपर्यंत होईल, असे विभाग नियंत्रक कार्यालयाकडून सांगण्यात आले. ते भाडे जिल्हा प्रशासन एसटी महामंडळाला देईल. त्या गाड्यांमधून किती प्रवासी आले, यापेक्षा त्या गावातून गाड्या आल्याचे भाडे मोजावे लागणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments