सर्व नोडल अधिकारी यांनी निवडणूक कामकाजाची जबाबदारी अत्यंत दक्ष राहून पार पाडावी -जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व संबंधित नोडल अधिकारी यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत दक्ष राहून पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व संबंधित निवडणूक नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अकरा मतदारसंघातील एकूण 3 हजार 723 मतदान केंद्रावर अत्यंत चांगल्या सोयीसुविधा मतदारांना उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी यांनी ग्रामीण व शहरी भागात सर्व मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करून घेण्याबाबतची कार्यवाही करावी. त्याप्रमाणे सर्व संबंधित अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रिसायडिंग ऑफिसर च्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावरील किमान दहा मतदारांना लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदान केंद्रावर देण्यात आलेल्या सोयी सुविधा बाबत प्रश्न विचारून माहिती घ्यावी. तसेच या मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी अधिकारी यांची वर्तणूक कशी होती याबाबत ही माहिती घ्यावी. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर आलेल्या सूचनेप्रमाणे अधिकच्या सुविधा उपलब्ध करणे सोयीचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रापैकी 50 टक्के मतदान केंद्रावर आयोगाच्या सूचनेप्रमाणे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. तरी वेब कास्टिंग करणाऱ्या महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना अत्यंत सूक्ष्म प्रशिक्षण देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. राजकीय पक्ष व उमेदवारांना जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या विविध परवानग्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या एक खिडकी योजनेअंतर्गत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत दक्ष राहून काम करावे व विहित वेळेत त्यांना परवानगी मिळतील याबाबत दक्षता घ्यावी असे त्यांनी सूचित केले.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्ट्रॉंग रूम निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व्यवस्थित करण्यात आलेल्या आहेत का याबाबत खात्री करण्यासाठी 21 ऑक्टोबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी चार विधानसभा मतदारसंघात, महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर तीन, तर आपण स्वतः चार विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रूम ची पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. त्याप्रमाणेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंतपालन होण्यासाठी आयोगाने उपलब्ध करून दिलेले नियमावली पुस्तकांचे वाचन करावे, अशी सूचना त्यांनी केली.
सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम नियोजित करून अत्यंत सूक्ष्मपणे प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जागाही उत्तम असावी. दोन दिवस प्रशिक्षण कार्यक्रम ठेवून चार सत्र घ्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. तसेच स्विफ्ट अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जेंडर रेशो वाढवण्यासाठी केलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी यावेळी घेतली. त्याप्रमाणेच दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी मतदानाची टक्केवारी कशा पद्धतीने वाढेल यासाठी मतदार जनजागृती स्वीपचे नोडल अधिकारी व सर्व संबंधित निवडणूक अधिकारी कर्मचारी यांनी करावी.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मनुष्यबळ प्रशिक्षण व्यवस्थापन, साहित्य व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, सायबर सिक्युरिटी, स्वीप कार्यक्रम, कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता कक्ष, खर्च समिती पोस्टल बॅलेट, कम्युनिकेशन प्लॅन, माध्यम कक्ष, निवडणूक निरीक्षक, दीव्यांग मतदार, मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा, स्ट्रॉंग रूम आणि काउंटिंग सेंटर, वेब कास्टिंग, बॉर्डर मॅनेजमेंट, फूड मॅनेजमेंट, जिल्हा नियंत्रण कक्ष, वैद्यकीय सोयी सुविधा आदीसह अन्य सर्व नोडल अधिकारी यांच्या कामांची सविस्तर माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.
0 Comments