ज्ञानाच्या ज्योतीने । अज्ञान घालवा
जगद्गुरू तुकोबांनी आपल्या एका अभंगातून आपण दसरा-दिवाळी केव्हा साजरी करतो, हे सांगताना म्हटलंय- दसरा- दिवाळी तेचि आम्हां सण। सखे संतजन घरासि येती ॥ अर्थात, जेव्हा आपलं घर सुहृदांच्या, प्रेमळांच्या, सद्गुणांवर प्रेम करणाऱ्यांच्या अस्तित्वाने भरतं, संपन्न होतं, तेव्हा आपणाला दिवाळी असल्यासारखं वाटतं, तेव्हा आपण दिवाळी साजरी करतो. त्यामुळे ती कार्तिक महिन्यातच यायला हवी, असं काही नाही. सज्जन सखेसोयरे, मित्र संतसज्जन भेटले की, दिवाळीसारखा हर्षोल्लास व्हायला, आनंदाला उधाणाची भरती यायला हरकत नाही, असं ते म्हणतात आणि संस्कारांचं नवं तत्त्व आग्रहपूर्वक, उदाहरणासह समाजाला शिकवतात. त्यांच्या प्रतिपादनाला मार्गदर्शन, आदेश, संदेश मानल्यास समाज हुकूमी दिवाळी केव्हाही साजरी करू शकेल.
बालकवींची एक कविता आहे, आनंदी आनंद गडे। इकडे तिकडे चोहीकडे ॥ बहुतेक त्यांनी ही कविता दिवाळीसारख्या सणातील आनंद पाहून लिहिली असेल. बालकवी निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. पण ते चिंतनशीलही होते. आपल्या कवितेत त्यांनी आनंदाची उधळण केली खरी, पण जगात कपटी, स्वार्थी, क्षुद्र मनोवृत्तीची, संकुचित मनाची, द्वेष-मत्सर-सूड या भावनांनी धगधगणारी माणसं असताना हा विश्वव्यापी आनंद नष्ट होईल का, या प्रश्नाचं उत्तर चिंतनशीलतेच्या पातळीवरून देताना ते म्हणतात, स्वार्थाच्या बाजारात। किती पामरे रडतात। त्यांना मोद कसा होतो? । सोडून स्वार्था तो जातो।। म्हणजेच दुर्गुणी माणूस तिन्ही त्रिकाळ अवगुणी नसतो, हे मानसशास्त्रीय सत्य आहे. त्याच्या मनातून स्वार्थ बाहेर पडला की, त्याची जागा आनंदाने भरून काढली जाते. असा थोडासा काळ जरी आनंद एखाद्याला लाभला, तरी त्याचं आयुष्य धन्य होतं.
तुकोबारायांचा पुढील आनंद प्रदर्शक अभंग तर खूपच सुंदर आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे॥ काय सांगू झाले काहीचिया बाही। पुढे चाली नाही आवडीने॥ गर्भाचे आवडी, मातेचा डोहळा। तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥ तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा। अनुभव सरिसा मुखा आला॥ ही आनंदभावना अंधारावर विजय मिळवणाऱ्या दीपज्योतीसारखी जीवनाला उभारी देणारी, मरगळ झटकून उत्साह देणारी शुद्ध जीवनवादी, इहवादी आहे. संत ज्ञानेश्वरही इहवादाच्या आनंदाकडे पाठ फिरवीत नाहीत. दिवाळी जो भौतिक, इहवादी आनंद देऊ इच्छिते, तसा आनंद प्रत्येक व्यक्तीला मिळत जावा, असं त्यांनाही वाटतं. म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरीत लिहिलं आहे, ऐसे युगुतिचेनि हाथे। जैं इंद्रिया ॐचे भाते। तैं संतोसि वाढते। मनुचि कमी ॥ या ओवीची इहवादी समीक्षा करताना डॉ. सबनीस म्हणतात, 'इंद्रियांची गरज ज्ञानेश्वर नाकारत नाहीत. शरीरधर्माची नैसर्गिकता समजून घेण्याची शास्त्रीय घाटी त्यांच्यात आहेच. कारण शरीरधर्माच्या गरजांची पूर्तता झाल्याने मनाला आनंद होतो, हे सत्य ज्ञानेश्वरांनाही सांगायचं आहे.' आणि दिवाळीचा सण तर वर्षभरातील आनंदाचं महापर्व आहे. दिवाळीचा आनंद घेणं हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, असं चार्वाकापासून ज्ञानेश्वर, तुकाराम, बालकवी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत सारेच कवी, तत्त्वज्ञानी, भक्त सांगत आले आहेत. या दृष्टीने नवरात्रीचं दांडियानृत्य वजा केलं, सोनं वाटण्याची स्नेहभेट वजा केली, तर उपासतापास, पूजाअर्चा, सोवळे-ओवळे, घटस्थापना, देव बसवणे-उठवणे ही सारी कर्मकांडं आनंदसंप्रदायात नीट बसत नाहीत. दिवाळीपर्वातही अशी अनाहूतपणे काही कर्मकांडं मंत्रोच्चारपूर्वक लक्ष्मीपूजनासारख्या मार्गानी घुसखोरी करीत आहेत. ती वजा केली, तरच मुक्त मनाने दिवाळीचा आनंद घेणं अवघड नाही.
दिवाळीच्या पणत्या, त्यांच्यातील तेलवात, त्यांची अंधारावर मात करण्याची क्षमता हे सर्व तमसो मा ज्योतिर्गमय- अर्थात, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची उज्ज्वल आकांक्षा तर आहेच, म्हणूनच ते मृत्यूला मागे टाकून जीवनाकडे जाण्याचं प्रतीकही होत असतं. विषमतेच्या अंधारात अर्ध्याहून अधिक जग बुडालं असून त्याला वर काढून ते जग प्रकाशाने उजळायचं असेल, तर देव, धर्म, देश यांच्या सीमा तोडाव्या लागतील. समाजनिष्ठ, समतावादी कवी सुर्वे म्हणतात, देहाच्या वाती वळून, प्रज्वलित करून । तुझ्या निरांजनात पालवून । एका नव्या क्रांतीकडे, नव्या प्रकाशाकडे। आमचे घोडे उधळले, तर हे देशा। कृतघ्नतेचे आरोप आमच्यावर करू नकोस ॥ नव्या प्रकाशाकडे जाण्याचा ध्यास विषमतेच्या अंधारात ठेचाळत भटकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनीमानसी दिवाळीच्या निमित्ताने दाटून आला पाहिजे, असं कवीला वाटतं. विषमताविरोधक कवी विंदा करंदीकर- नागड्यांनो उठा। उगवा रे सूड। देहाचीच चूड। पेटवोनी॥ अशी हाक अंधारावर मात करण्यासाठी, भविष्यकाळातील सर्वंकष, सर्वसमावेशक दीपोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने देतात.
समतेच्या प्रस्थापनाची गरज पूर्वीही होती आणि आजही तितकीच आहे. समतापूजक बळीराजाने आपल्या कर्तृत्वाने सर्वत्र समता नेली, हे बहुजनसमाज आणि परंपरापीडित, विषमतेला बळी पडलेल्या माता- भगिनी कधीही विसरणार नाहीत. म्हणूनच भाऊबीजेदिवशी त्या इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, असं करतात, आनंद व्यक्त करतात. दीप प्रज्वलित करतात. दिवाळी हा बळीराजाची कीर्ती आणि स्मृती चिरंतन जागवण्याचा महोत्सव आहे.
बळीराजाप्रमाणे जे समताप्रेमी आहेत, त्यांनी समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत दिवाळीचा आनंद न्यावा, असं आवाहन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, दिवाळीचा सण आला। सर्वांनीच पाहिजे केला। परि पाहावा कोण राहिला। भुकेला घरी। त्यास आमंत्रित करावे। गोडधोड भोजन द्यावे। परस्परांनी मिळून चालवावे। वैभव सर्वांचे। लोकांनी मनावर घेतलं, तर जग समतेची, समृद्धीची, चैतन्याची, प्रकाशमय दिवाळी नक्की साजरी करू शकेल. पण तोपर्यंत आपण आपलं घर, आपलं अंगण, आपलं मन आणि आपला परिसर जरी प्रकाशित केला, एक पणती का असेना, पण ती अंधारावर, विषमतेवर मात करण्याचं प्रतीक समजून पाजळली, तरी दिवाळीचा आपल्या मनावर होणारा संस्कार दृढ होईल आणि खरी दिवाळी मनोयोगपूर्वक साजरी केल्याचं समाधान लाभेल. त्यासाठी-
दिवाळीचे करा । स्वागत प्रेमाने
जीवन तेजाने । उजळावे ॥१
प्रकाशाची पूजा । प्रकाशाची भक्ती
जीवनाची शक्ती । खरी तीच ॥२
स्मरा बळीराजा । स्मरा त्याचे कार्य
त्यागमूर्ती थोर । अद्वितीय ॥ ३
थोर जोतीराव । प्रकाशपूजक
ज्ञानाचा दीपक । पाजळिला ॥४
स्मरा लोकराजा । राजर्षी शाहूंना
आणी पतितांना । उजेडात ॥५
प्रकाशित व्हावे। सारे जनमन
दिवाळीचा सण । खरा तोच ॥६
ज्ञानाच्या ज्योतीने। अज्ञान घालवा
जगण्याला तेव्हा । अर्थ येई ॥७
अनंत दीपांनी। दिवाळी उजळो
तम दूर पळो । भयकारी ॥ ८
0 Comments