Hot Posts

6/recent/ticker-posts

लोक रूढींच्या तावडीत सापडतात.

लोक रूढींच्या तावडीत सापडतात.



वाळी हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. सर्व सणांमधील प्रमुख सण आहे. नावावरूनच शोध घ्यायचा तर दीप, दिवे, पणत्या, पाजळण्याचा हा सण आहे. दीपोत्सव, दीपदान, दीपविसर्जन या शब्दांतील साधारण (Common) असा जो दीप शब्द आहे, तो भेटतो बुद्धांच्या उपदेशात. गौतम बुद्ध म्हणाले, 'अत्तदीपो भव' अर्थात, आत्मदीप व्हा! एकदा श्रावस्तीमध्ये असताना तथागत भिक्खूंना म्हणाले, 'भिक्खूंनो, अत्तदीप (आत्मदीप), आत्मशरण, अनन्यशरण, धम्मदीप, धम्मशरण होऊन विहार करा!' तथागत गौतम बुद्धांच्या उपदेशाचा अर्थ स्पष्ट करताना डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात, 'अत्तदीप हा माणसाला स्वतःचा कणा देणारा विचार आहे. जीवन जगण्यासाठी लायक बनवणारा हा उपदेश आहे. स्वतःच्या प्रत्येक कृतीची जणू काही स्वतःच्या प्रत्येक श्वासाची, जबाबदारी माणसाने स्वतःच घेतली पाहिजे, हे शिकवणारा. खरं तर जीवनाला प्रसन्नपणे, निर्भयपणे सामोरं जाण्याचं धैर्य देणारा संदेश आहे.'


आपलं अंतःकरण, आपलं मन, आपल्या भावना, आपली सद्सद्विवेकबुद्धी चिंतनाच्या दिव्याने प्रकाशित करणं, हे प्रत्येक सुजाण, सुबुद्ध, सुसंस्कारी माणसाचं अत्यावश्यक काम आहे. संत सोहिरोबांनी म्हटलंय, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे! शहाणा मनुष्य प्रत्येक क्षणी मनाला जागृत ठेवतो. समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीतील, प्रसंगातील, घटनेतील सत्य बुद्धीच्या प्रकाशात पारखून घेण्याची क्रिया हा विवेकाचा जागर असतो. सत्यासत्याच्या निर्णयाचा अटीतटीचा सामना असतो. त्यावेळी आपला ज्ञानदीप मंद झाला, की असत्य वरचढ होतं. भारतीय समाजात अज्ञान खूप आहे. अनेकांची अंतःकरणं अंधाराने भरलेली आहेत. असे लोक रूढींच्या तावडीत सापडतात.


स्वामी विवेकानंद म्हणतात, 'दुसऱ्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवल्याने किती अनिष्ट होतं, ते मी पाहिलं आहे. माझ्या देशात तर त्या विश्वास ठेवण्याचा कहर झाला आहे. जुन्या दंतकथांना अवास्तव महत्त्व दिल्याने अंधविश्वास व खुळचट समजुती बळावतात, म्हणून समस्त अंधविश्वास झुगारा. जात, कुळ, देवदेवता सारं काही नाहीसं होऊ द्या!'


चिकित्साबुद्धीचा विकास अज्ञानी माणूस घडवू शकत नाही. त्यामुळे आम्ही भारतीय बुद्धांच्या पूर्वीही अंधारात चाचपडत होतो आणि आता बुद्धांनी अत्तदीपो भव असा संदेश दिल्यावरही अंधारातूनच ठेचा खात आहोत. ह्या अंधाऱ्या वास्तवाची जाणीव आमच्या वैचारिक नेत्यांना जशी तीव्रतेने झाली, तशीच आपल्या काही सुजाण पूर्वजानांही झाली. त्यांनी कार्तिक महिन्याच्या घनांध काळोखात दीपोत्सव करून तथागतांच्या संदेशाचं वहन सुकर केलं.


दिवाळी हा सण कुणा तरी राजाने हुकूम काढला आणि सुरू झाला असं घडलं नसावं. माणूस जेव्हा छोट्या वाड्यावस्त्या करून राहू लागला, पितरांचं स्मरण करू लागला, तेव्हापासून घरातील दिवे अंगणात आले. अंगण लखलखलं. भूमातेने उदारपणे दिलेलं नवं अन्न निवांतपणाचे दोन क्षण घेऊन आलं, तेव्हा भूमी कसणाऱ्या गृहस्वामीचा गृहलक्ष्मीने दिवे ओवाळून आदर केला. आपला कृतज्ञताभाव व्यक्त केला. गृहस्वामी आणि गृहलक्ष्मीचं हे प्रेमपूर्ण भावबंधन हीच दीपोत्सवाची सुरुवात असावी. तथागतांना दीप हे अंधारावर प्रकाशाचा विजय सूचित करण्यासाठी उचित प्रतीक वाटल्यामुळेच त्यांनी आत्मदीप होण्याचा अमृतसंदेश दिला.


इडापीडा टळो, बळीचं राज्य येवो ही मंगल कामना बळीराजाची पवित्र स्मृती जागवण्याचं कार्य हजारो वर्ष करीत आली आहे आणि आजही ती कृषिसंस्कृतीवंतांच्या घराघरांत गृहस्वामींना आणि भावी वंशाधारांना ओवाळताना प्रकट होते. बळीराजा उदार होता, समतावादी होता. न्यायी होता. गोरगरिबांचा हितकर्ता होता. शोषकांना पायबंद घालणारा, उच्चनीच भावनेला अव्हेरणारा, निष्पक्ष, निर्लोभी, उदार, प्रजाहितदक्ष, कर्तव्यबुद्धीप्रेरित होता.


बळीवंश ह्या डॉ.आ.ह. साळुंखे यांच्या संशोधित ग्रंथात बळीराजाचे येणारे उल्लेख चिंतनप्रेरक आहेत. डॉ. साळुंखे लिहितात, 'बळीराजा-सात काळजांच्या आत जपून ठेवावा असा जिवलग होता. बहुजन समाजाचा श्रेष्ठ पूर्वज आणि महान नायक होता. बहुजन समाजाला सच्ची अस्मिता आणि जीवननिष्ठ संस्कृती देण्यात त्याचा वाटा फार मोठा आहे. बळी निरहंकारी आणि तत्त्वदर्शी होता. यज्ञयागापासून अलिप्त होता. लोकांना संपत्ती समान वाटणारा होता. म्हणूनच समाज त्याच्या पुनरागमनाची इच्छा आजही करीत असतो. '


बौद्ध धम्माच्या अनुयायींनी गौतम बुद्धांचा पूर्वावतार (पूर्वी होऊन गेलेला थोर पुरुष या अर्थी) म्हणून बळीराजाचा उल्लेख केला आहे. गौतम बुद्धांनी आत्मदीप व्हा असा संदेश दिला, तो बळीचं समताप्रेरक राज्य यावं म्हणूनच! दीपावलीचा दीपोत्सव हे बळीचं पुण्यपावन स्मरण आहे. हा मंगल उत्सव प्रत्येकाला चिंतनशील बनवतो. बळीची वंशपताका आपण समतावादी होऊन उन्नत करीत आहोत, की विषमताग्रस्त होऊन अवनत करीत आहोत, हे आपण बारकाईने पाहिलं पाहिजे.


जगातील सर्व थोर पुरुष चेहऱ्यावर आनंदी दिसत असले, तरी आतून खिन्न असावेत. महात्मा गांधीजींनी दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नान करून लाडूचिवडा खाऊन फटाके उडवले नसतील. गाडगेबाबा नवे कपडे घालून नटले असतील का? छत्रपती शाहू महाराजांनी राजवाड्यावर दीपावलीच्या रोषणाईचा आदेश दिल्याची नोंद कधीतरी सापडेल का? दिवाळीच्या दिवशीसुद्धा ते निर्जन, एकांतवासी सोनतळी कॅम्पवर गार पाण्याची अंघोळ करीत असायचे. दिवाळीसारखे सण महापुरुषांना अधिकच अंतर्मुख करीत असतात. आपला मानसदीप अधिक प्रज्वलित करून ते सामाजिक विषमता, सामाजिकांची कोती आणि विकृत बुद्धी, दरिद्री लोकांच्या हालअपेष्टा आणि जगाच्या व्यथित करणाऱ्या विराट प्रश्नांसमोर होणारी आपली अगतिकता, कुचंबणा, हतबलता यांनी अक्षरशः भंडावून जात असावेत.


दिवाळीच्या दिवशी फोडणीसाठी एक पणतीभर तेल घेण्यासाठी किराणा दुकानात आलेल्या एका गरीब मुलीची कथा पु.ल.देशपांडे यांनी लिहिली आहे. तिला दहा पैशांचं खायाचं तेल हवं होतं. तिच्यापाशी होते दहा पैसे. कमीत कमी पंधरा पैशाशिवाय तेल द्यायला दुकानदार तयार नव्हता. पु.ल. म्हणतात, ‘त्याची आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचं खायाचं तेल परवडत नाही.. आता पणतीचं आणि माझं नातं दिवाळीच्या रोषणाईशी होतं, ते तुटून गेलं आहे. पणत्यांची आरास पाहिली की, आमच्याकडं धाच पैसे हाइत म्हणणारी ती मुलगी-नव्हे एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो. दिवाळीसारख्या अनेक गोष्टींची नाती तुटत तुटत मी शून्य होत जातो.'


स्वामी विवेकानंदाकडे गोरक्षा मंडळाचे कार्यकर्ते आले. स्वामीजींनी विचारलं, आतापर्यंत किती पैसा जमला?


कार्यकर्ते म्हणाले, मारवाडी व्यापाऱ्यांनी बराच पैसा दिला आहे.


स्वामी म्हणाले, मध्यभारतात भयंकर दुष्काळात नऊ लाख माणसं अन्न-अन्न म्हणत मेली. त्यांना तुम्ही काही मदत दिली?


कार्यकर्ते म्हणाले, हा दुष्काळ त्या मेलेल्या माणसांच्या कर्माचं फळ आहे. अशा लोकांना आम्ही मदत करीत नसतो. गोमाता आपली आई आहे?


स्वामीजी खेदाने म्हणाले, आपणासारखी दिव्य प्रजा आणखी कुणापोटी बरं निपजणार!


विवेकानंदानी आपला चिंतनाने तेजाळणारा आत्मदीप कधीच मंदावू दिला नव्हता. महात्मा गांधी, लोकसंत गाडगेबाबा, पुरोगामी स्वामी विवेकानंद यांचं स्मरण केल्याने दिवाळीचा सात्त्विक आनंद नक्कीच द्विगुणित होईल. कारण -

दीप पाजळता । अंधार पळाला

परिसर झाला । लख्ख लख्ख ||१

आकाशदिव्यांनी । प्रकाशित झाली

सदने नटली । गरिबांची ॥२

दीनदुबळ्यांच्या | झोपड्यांच्या पोटी

आगीचीच भीती । रात्रंदिन ॥३

आंधळा भिकारी । झोळी चाचपतो

धोंडा हाती येतो। नव्हे लाडू ॥४

अश्रू पुसूनिया। भगिनी ओवाळी

टिळा लावी भाळी । फुटलेल्या ॥५

बळीराज्य येवो । आत्महत्या टळो

पणतीत जळो । दुःखदैन्य ॥६

हक्काच्या दारात । अनाथ म्हातारा

म्हणे मृत्यू बरा । सणावारी ॥७

अशी दीपावली । कोठे नाचतसे

कोठे गाळीतसे । अश्रूधारा ॥८ 

Reactions

Post a Comment

0 Comments