'मविआ'साठी ठाकरेंनी नमतं घेतलं! 'या' मतदारसंघातून उमेदवार मागे: काँग्रेसची वाट मोकळी
विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा दिवस म्हणजेच 29 ऑक्टोबर शेवटची तारीख असतानाही अनेक मतदारसंघांमधील जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असल्याने अनेक इच्छुकांची धाकाधुक वाढली आहे.
असं असतानाच जागावाटपावरुन महाविकास आघाडीत असलेले मतभेद उघडपणे समोर आले आहेत. खास करुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील मतभेद प्रसारमाध्यमांमध्येही चर्चेत राहिलेत. एकीकडे हे मतदभेद आणि दुसरीकडे काँग्रेसवर ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार याद्या जाहीर करताना एका उमेदवार संघात एकमेकांविरोधात उमेदवार दिल्याचं स्पष्ट झालं. याचसंदर्भात संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
एकाच मतदारसंघात दोन उमेदवार
महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच उमेदवारी यादीमध्येही या वादाचे प्रतिबिंब पाहायला मिळालं. काँग्रेसने शनिवारी सकाळी दुसरी यादी जाहीर केल्यानंतर त्याच दिवशी रात्री उशीरा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार आधीच जाहीर केला आहे तिथे काँग्रेसनेही तिसऱ्या यादीत उमेदवार जाहीर केला. काँग्रेसने शनिवारी रात्री 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाच्या तिन्ही याद्यांमध्ये एकूण 87 उमेदवारांची नावं घोषित झाली. काँग्रेसने तिसऱ्या यादीत जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये दिग्रस मतदारसंघांतून माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र या मतदारसंघातून आधीच ठाकरेंच्या पक्षाने पवन जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण या उमेदवारीसंदर्भात संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना मोठी घोषणा केली.
ठाकरेंनी इथून मागे घेतला उमेदवार
पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी, "शिवसेनेनं उमेदवार दिलेला असताना काँग्रेसच्या यादीत त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. मी असं मानतो की ही टायपींग मिस्टेक आहे. पण अशा टायपींग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात. दिग्रजसंदर्भात आमची आणि काँग्रेसची चर्चा झालेली आहे. दिग्रजमध्ये आमचा उमेदवार लढणार नाही. माणिकराव ठाकरेंसाठी ती जागा आम्ही सोडलेली आहे," असं सांगितलं. म्हणजेच ठाकरेंचे उमेदवार पवन जयस्वाल दिग्रसमधून लढणार नाहीत.
मोबदल्यात मिळाला हा मतदारसंघ
"काल त्यासंदर्भात बाळासाहेब थोरात, रमेश चेन्नीथेलेलांबरोबर चर्चा झाली. दिग्रजच्या मोबदल्यात आम्हाला दर्यापूर हा मतदारसंघ दिलेला आहे. तो वाद नाही. भूम परंडासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद नाही. थोडा गोंधळ झालेला आहे. सुरुवातीला आम्ही जागा एकमेकांना बदलावी यासाठी चर्चा होईल. मात्र दक्षिण कोल्हापूरसंदर्भात काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. मिरजमध्ये आपला उमेदवार देण्यासंदर्भात काँग्रेसचे काही लोक चर्चा करत असल्याचं माझ्या कानी आलं, असं जर झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात ही लागण लागेल आणि महाविकास आघाडीला अचण निर्माण होईल. म्हणूनच आम्ही ठरवलंय की तिघांनी एकमेकांशी चर्चा करायची आणि ठरवायचं असं ठरलं आहे," असं राऊत म्हणाले.
मुंबईत शिवसेना जिंकायला हवी
"काँग्रेसची मागणी आहे की आम्हाला एखादी दुसरी जागा मिळावी. मात्र जागावाटप आमच्या दृष्टीने झालेलं आहे. मुंबईत सर्वात कमी जागा खरं तर राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्यात मात्र त्यांनी समजून घेतलं. ज्याप्रमाणे विदर्भात काँग्रेस हवी तशी मुंबईत शिवसेना जिंकायला हवी," असंही राऊत म्हणाले
0 Comments