मविआमधील तिढा सुटेना, शरद पवार यांनी जागावाटपाबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या जागावाटपाबाबत माहिती देताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांचा आढावा मी सतत घेत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांना महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद दिला, त्याची नोंद आम्ही आमच्या अंत:करणात ठेवलेली आहे. आता महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने आम्ही सगळ्या जागांवर लढत आहोत. तीन प्रमुख पक्षांमध्ये आणि मित्रपक्षांमध्ये बसून एकवाक्यता ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. विधानसभेच्या एकूण जागांपैकी ९० ते ९५ टक्के जागांवर आम्हा सर्वांचं एकमत झालं आहे. काही जागांबाबतचा विचार विनिमय आमच्या सहकाऱ्यांमध्ये सुरू आहे. ती स्पष्टता एक किंवा दोन दिवसांमध्ये येईल, याची मला खात्री आहे, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले की, आम्हाला महाराष्ट्रामध्ये सत्तापरिवर्तन करायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत. तसेच आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडून ते सोडवले गेले नाहीत. त्यामुळे अलिकडच्या काळामध्ये जी पक्षफुटी, पक्षांची मोडतोड करणं, सत्तेसाठी नको तिथे तडजोडी करणं, हे कृत्य ज्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये केलं आहे त्यांच्याबाबत जनतेमध्ये जाऊन भूमिका मांडणं आणि परिवर्तनाला जनतेला तयार करणं ही भूमिका आमच्याकडून केली जाईल. तसेच महाराष्ट्राच्या जनतेला मी विश्वास देतो की, महाविकास आघाडीच्यावतीने महाराष्ट्रामध्ये एक जनतेच्या हिताची जपणूक करणारं, शेतकरी, महागाई, बेरोजगारी यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, एवढा विश्वास मी महाराष्ट्रातील जनतेला देतो, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
0 Comments