Hot Posts

6/recent/ticker-posts

"यहाँ के हम सिकंदर" दिव्यांग मुलांचा सोलापुरात कला महोत्सव

 "यहाँ के हम सिकंदर" दिव्यांग मुलांचा सोलापुरात कला महोत्सव


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईची घटक संस्था बालरंगभूमी परिषद मुंबई, यांच्या वतीने मंगळवार दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या औचित्य साधून "यहाँ के हम सिकंदर" हा विशेष (दिव्यांग) मुलांचा महोत्सव येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी ९-०० ते सायंकाळी ५-०० या वेळेत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्तीच्या अध्यक्षा नाट्य आणि सिने अभिनेत्री नीलम शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूरच्या नूतन खासदार प्रणितीताई शिंदे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश यलगुलवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते शशीकांत ढेकळे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखा करीत आहे. अशी माहिती बालरंगभूमी सोलापूर शाखेचे अध्यक्ष सीमा यलगुलवार- श्रीगोंदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विशेष मुलांचा कला महोत्सव

   बालरंगभूमी परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रात बालकांच्या कला गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईची घटक संस्था आहे. ही संस्था बालवयातील तसेच किशोर व कुमार वयातील मुलांमधील नाट्य, अभिनय, गीत-गायन, नृत्य, काव्य या व इतर अशा अनेक कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण शिबीर व स्पर्धांचे आयोजन करीत असते. बालरंगभूमी परिषद मुलांच्या सांस्कृतिक शैक्षणिक, सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कार्य करत असताना, विशेष (दिव्यांग) मुलांना सुध्दा व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच  त्यांच्यातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देवून त्यांना सक्षम मुलांच्या प्रवाहात आणण्यासाठी "यहाँ के हम सिकंदर' हा विशेष (दिव्यांग) मुलांचे कलागुण सादरीकरणामागचा उददेश आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून विशेष (दिव्यांग) मुलांच्या कलागुणांना आणि त्यांनी तयार केलेल्या कलाकृतींना प्रोत्साहन तर मिळेलच, पण या विशेष मुलांसाठी कार्य करीत असणाऱ्या संस्था, शाळा यांचाही गौरव या निमित्ताने होणार आहे. या पत्रकार परिषदेला बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष, कार्यकारणी सदस्य, सल्लागार मंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

सहभागी कलावंतांना मोफत भोजन व्यवस्था

"यहाँ के हम सिकंदर" विशेष (दिव्यांग) मुलांचा कला महोत्सवात सहभागी झालेल्या विशेष बालकलावंतांना व त्यांच्यासोबत येणा-या शिक्षकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखा यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
तरी विशेष (दिव्यांग) मुलांच्या कला महोत्सवाचा आस्वाद सोलापुरातील नाट्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सीमा श्रीगोंदेकर- यलगुलवार यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments