Hot Posts

6/recent/ticker-posts

महायुतीत मिठाचा खडा?

महायुतीत मिठाचा खडा? 



मुंबई (कटूसत्य वृत्त):- नवाब मलिकांविरोधात   भाजपाने  पुन्हा एकदा दंड थोपटल्याने अजित पवारांची अडचण झाली आहे. अणुशक्तीनगरचे विद्यमान आमदार असलेल्या नवाब मलिकांना उमेदवारी देण्यास भाजपाने कडाडून विरोध केला.

त्यामुळे अजित पवारांनी अणुशक्तीनगरमधून मलिकांच्या कन्या सना मलिकांना  मानाचं पान देत उमेदवारी जाहीर केली. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिकांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आग्रही असल्याची माहिती आहे. यादरम्यान आशिष शेलार यांनी आम्ही त्यांचं काम करणार नाही अशी भूमिका मांडली आहे. त्यातच नवाब मलिक यांनी काही झालं तरी आपण निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

महायुतीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना सध्या नवाब मलिकांवर येऊन ही चर्चा रखडली आहे. भाजपाने नवाब मलिक यांना सुरुवातीपासूनच जोरदार विरोध केलेला आहे. महायुतीत सहभागी करून घेण्यावरून आणि आता उमेदवारी देण्यावरून भाजपचा मलिकांना विरोध कायम आहे.

महायुतीत अजित पवारांचं स्वागत पण नवाब मलिक नको ही भाजपाची भूमिका कायम आहे. विधानसभा निवडणुकीला नबाव मलिकांना उमेदवारी दिल्यास भाजपा त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. भाजपाच्या या विरोधामुळेच अजित पवारांना नवाब मलिकांच्या उमेदवारीची घोषणा करता आलेली नाही. नवाब मलिकांचं काम करणार नाही असं सांगताच सना मलिक यांच्या प्रचाराबाबत देवेंद्र फडणवीस भूमिका मांडतील असं आशिष शेलारांनी सांगितलं आहे.

नवाब मलिकांच्या उमेदवारीबाबत महायुतीच्या बैठकीत निर्णय झाला आहे. त्यामुळे अजित पवार नवाब मलिकांची उमेदवारी जाहीर करणार नाहीत असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

भाजपाचा विरोध असतानाही अजित पवार यांनी नवाब मलिक यांना पक्षात घेतलं. तसंच त्यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मधून उमेदवारी देखील दिली. मात्र आता नवाब मलिकांवरुन चर्चा अडली आहे. भाजपाचा विरोध असल्याने नवाब मलिक यांचा पत्ता कट करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या विषयी स्वतः अजित पवार यांनी माहिती दिली." कोणाचाच पत्ता कट होणार नाही. नवाब मलिक यांच्याबाबत अजूनही चर्चा सुरू असून निर्णय घेण्यात आलेला नाही. बातम्या चुकीच्या दिल्या जात आहेत," असं त्यांनी सांगितलं होतं.

भाजपचा विरोध का?

- आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोप
- नवाब मलिक यांचे सबंध दाऊदशी आहे असा त्यांवर करण्यात आला होता.
- याच मुद्द्यावरून भाजपने नवाब मलिक यांना 'देशद्रोही' म्हटलं होतं.
- मुंबई बॉम्बस्फोटातील अरोपिशी मलिक यांचे संबंध असल्याचा देखील आरोप भाजपकडून करण्यात आला होता..

मलिक अपक्ष लढणार?

नवाब मलिक हा कायम भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला अडचणीचा मुद्दा ठरत आलेला आहे. महायुतीनं उमेदवारी न दिल्यास मानखुर्द-शिवाजीनगरमधून नवाब मलिक अपक्ष लढण्याची शक्यता आहे. आपण 29 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

मानखुर्द-शिवाजीनगर या मुस्लीमबहुल मतदारसंघात मलिकांचा दांडगा संपर्क आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा अजित पवारांचा आग्रह आहे. मात्र भाजपनं आपला विरोध कायम ठेवल्याने अडचण निर्माण झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस काय तोडगा काढणार, हे पाहावं लागणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments