"ठाण्याची दाढी आमच्यासोबत." त्या 5 कोटींबाबत चर्चांना उधाण
सांगोला (कटूसत्य वृत्त):- खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापडलेल्या 5 कोटींबाबत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने "ठाण्याची दाढी आमच्यासोबत." असं मोठं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरु आहे.
दरम्यान पुण्यात नाकाबंदी दरम्यान ५ कोटींची रोकड सापडली होती. हे ५ कोटी रुपये आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर येत होती.
सविस्तर माहिती अशी की, खेड-शिवापूर टोल नाक्यावर जवळपास ५ कोटी रूपये जप्त करण्यात आले होते. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. ही रक्कम शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले होते. प्रत्येक उमेदवाराला ते ७५ कोटी देणार आहेत. त्यातील १५ कोटींचा हा पहिला हफ्ता होता ,असा आरोपही राऊत यांनी केला होता. दरम्यान हे आरोप शहाजी बापू पाटील यांनी फेटाळले होते.
त्यानंतर आता शहाजी बापू यांच्या कार्यकर्त्याने याबाबत मोठं विधान केलं आहे. नाकाबंदी दरम्यान सापडलेल्या ५ कोटी रुपयांबाबत बोलताना सांगोला शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे म्हणाले, त्या गाडीची चर्चा करू नका. त्यासाठी ठाण्याची दाढी आमच्यासोबत आहे, असं म्हणत लवटे यांनी या प्रकरणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशी चर्चा जोरात सुरु आहे.
0 Comments