अनाधिकृत बांधकामः सुश्रुत हॉस्पिटलवर नगर पालिकेकडून गुन्हा दाखल
बार्शी (कटूसत्य वृत्त ):नगरपालिकेने दिलेल्या बांधकाम परवानगीच्या विरुध्द बांधकाम करून पार्किंग वापरासाठी केलेल्या तळमजल्यावर मेडिकल ओपीडीसाठी आरसीसी बांधकाम करून त्याचा विनापरवाना वापर सुरू केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ (६अ) याप्रमाणे सरकारतर्फे रचना सहायक देवानंद उत्तम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. अंधारे यांच्या सुश्रुत हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले, संदीप चतुर्भुज सुतार (रा.बार्शी) यांनी दि. ५ जून २०२३ रोजीपासून वेळीवेळी नगरपरिषदेकडे बार्शी येथील डॉ. संजय श्रीधर अंधारे यांचे सुश्रुत हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारी दिलेल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने डॉ. अंधारे यांचे सुश्रुत हॉस्पिटल गट नं. ८३९ पैकी या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांनी नगरपालिकेने दिलेल्या बांधकाम परवानगीच्या विरुध्द बांधकाम करून पार्किंग वापरासाठी अनुज्ञेय केलेल्या तळमजल्यावर मेडिकल तसेच ओपीडी अशा प्रकारचे सुमारे २१.२३ मीटर बाय ९.०५ मीटर या मापाचे आरसीसी बांधकाम करून त्याचा विनापरवाना वापर सुरू केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ अन्वये दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी नोटीस देऊन नगरपालिकेने दिलेल्या बांधकाम परवानगीच्या विरूध्द केलेले बांधकाम ३० दिवसापर्यंत काढण्याचे कळविले होते. त्यांनी आजपर्यंत सदर बांधकाम हे काढून घेतले नाही.
तसेच सदर बांधकामाचा वापर अनधिकृतपणे डॉ. संजय अंधारे हे करीत आहेत. सदरचे बांधकाम विनापरवाना असल्याचे दिसून आल्याने वरिष्ठांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ (६ अ) अन्वये डॉ. संजय श्रीधर अंधारे, सुश्रुत हॉस्पिटल, बार्शी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी नगरपालिका मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0 Comments