टिळा टोपी घालुनी माळा | म्हणती आम्ही साधू ||
दया धर्म चित्ती नाही | ते जाणावे भोंदू ||
बांधवांनो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुमारे चारशे वर्षांपूर्वी हा अभंग लिहिलेला आहे. या अभंगात ते स्पष्टपणे म्हणतात कपाळावर भला मोठा टिळा लावून, डोक्यावर टोपी घालून किंवा गळ्यामध्ये वेगवेगळ्या माळा घालून जे स्वतःला साधू म्हणून घेतात किंवा जगामध्ये साधू म्हणून मिरवतात ते केवळ त्यांच्या या बाह्य सोंगामुळे साधू आहेत का? तर याचे उत्तर नाही असे आहे. कारण एवढ्या सगळ्या बाह्य गोष्टी असूनही या लोकांच्या मनात दयाधर्म नसेल, त्यांच्या चित्तामध्ये अजिबात दया नसेल तर हे लोक कितीही गंध लावला, माळा घातल्या तरी ते भोंदूच आहेत असे तुकोबांनी आम्हाला सांगून ठेवलेले आहे.
हा अभंग आज आठवण्याचे कारण म्हणजे बदलापूर येथे आदर्श म्हटल्या जाणाऱ्या शाळेत चिमुकल्या लेकरांसोबत एका नराधमाने अत्याचार केला. त्या नराधमाचा फोटो जेव्हा सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला तेव्हा त्याच्या कपाळावर गंध लावलेला दिसून आला. अर्थातच तो धार्मिक (?) वृत्तीचा असेल असे या गंधावरून आपण म्हणू शकतो. पण खरंच या नराधमाला धर्म समजला का? कारण केवळ कपाळावर गंध लावणे म्हणजे आपण खूप धार्मिक आहोत असे नसते तर तुमच्या मनामध्ये सर्वसामान्य लोकांबद्दल दयाभाव असला पाहिजे, मायेचा ओलावा असला पाहिजे, त्यांच्याबद्दल कणव असली पाहिजे तरच तुम्ही खऱ्या अर्थाने धार्मिक मनुष्य होता. (अर्थात अपवाद आहेत.)
अहो ज्या लेकरांकडे बघितल्यानंतर माणसांच्या मनातील षडविकार जसे काम, क्रोध, मोह, मत्सर, माया ई. अगदी गळून पडावेत त्या लेकरांवरच बदलापूर येथील त्या नराधमाने पाशवी अत्याचार केला. अर्थातच तो धार्मिक तर जाऊ द्या पण मनुष्य म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा नाही. म्हणूनच वारकरी संप्रदायातील संत नामदेव संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंतच्या सर्व संतांनी तुमच्या पोषाखापेक्षा, वेषभूषेपेक्षा, गळ्यातील माळामुद्रांपेक्षा, कपाळावरील गंधांपेक्षा किंवा डोक्यांवरील जटांपेक्षा तुमच्या आचरणाला, तुमच्या अंतःकरणातील मायेच्या ओलाव्याला आणि तुमच्या चित्तात वसणाऱ्या नैतिकतेला प्रचंड प्रचंड महत्व दिलेले आहे. म्हणूनच आपण हे संत समजून घेणे आणि आपल्यामध्ये विवेक जागृत करणे अतिशय गरजेचे आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तर एका अभंगात स्पष्टपणे म्हटलेले आहे तोवरी तोवरी माळामुद्रांची भूषणे |जव तुक्याचे दर्शन झाले नाही || म्हणजे तुम्हाला गळ्यातल्या माळा, कपाळावरील गंध, वेगवेगळ्या मुद्रा यांचा अभिमान तोपर्यंतच वाटू शकतो जोपर्यंत खऱ्या तुकाराम महाराजांचे दर्शन होत नाही. आणि एकदा का तुम्हाला खरे तुकाराम महाराज समजले की तुमच्या मनातील या बाह्य गोष्टीबद्दल असणारा अभिमान पिकलेल्या पानासारखा गळून पडेल आणि तुम्हाला तुमच्यातील एका निर्मळ माणसाचे दर्शन होईल.
चला तर मग तुकाराम महाराज समजून घेऊया. संत समजून घेऊया.
हभप डॉ बालाजी महाराज जाधव, छत्रपती संभाजीनगर
0 Comments