केंद्राच्या उपक्रमामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांसमोर नवे आव्हान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 26, 2024

केंद्राच्या उपक्रमामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांसमोर नवे आव्हान

 केंद्राच्या उपक्रमामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांसमोर नवे आव्हान


मुंबई (कटूसत्य वृत्त):- केंद्रशासन निर्देशानुसार संपूर्ण देशभरात सोमवार 22 जुलै ते रविवार 28 जुलै या कालावधीत 'शिक्षण सप्ताह' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवशी एका विशिष्ट उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या अंतर्गत 28 जुलैला "समुदाय सहभाग दिवस" साजरा केला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तिथी भोजन, विद्यांजली असे काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. परंतु, स्नेहभोजन किंवा तिथी भोजन करिता त्या त्या शाळेच्या शिक्षकांनी, मुख्याध्यापकांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

स्नेहभोजनाच्या उपक्रमासाठी गावातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना स्नेहभोजन देण्याकरीता आवाहन करण्यात यावे, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. त्यामुळे गावातील दानशूर व्यक्तींचा शोध घेण्‍याचे काम मुख्‍याध्‍यापक आणि शिक्षकांवर सोपवण्यात आले आहे. तर, या उपक्रमासाठी एखादी दानशूर व्यक्ती किंवा अन्य कोणी सापडले नाही तर शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी स्वतःच्या खिशातून यासाठीचा खर्च करायचा आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.

या स्नेहभोजनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पूर्ण जेवण, मिठाई किंवा पूरक पोषक आहार देण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. या आहारात मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुका मेवा, काजू, बदाम, पिस्ते, मनुका, आक्रोड, बेदाणे, फळे, शिजविलेले पदार्थ, मिष्टान्न इत्यादीचा समावेश असलेले अन्न अशा पद्धतीचा आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा, असेही सांगण्यात आले आहे. भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तीनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा, असेही आदेश देण्यात आले आहे.

तर, खाद्य पदार्थ ताजे व पौष्टिक असावे, तांदूळ, गहू, नाचणी, शेवगा शेंग, डाळींसोबत हिरव्या पालेभाज्या प्राधान्याने दिल्या जाव्यात. बाजारातील वेष्टनबध्द पदार्थ (जंक फूड) तसेच उघड्यावरील आणि शिळे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत, यासोबतच जंक फूडच्या हानिकारक प्रभावांबद्दल विद्यार्थी आणि पालक तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, खाद्य पदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने शाळेत उपस्थित रहावे. तसेच खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्येच व दुपारच्या सुट्टीत तथा शालेय वेळेतच देण्यात यावेत. सदर भोजनातून अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता संबंधित वितरक आणि शाळेने घेणे आवश्यक आहे. आहाराचे वितरणाकरीता आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. समुदाय सहभाग दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करावा, तसेच राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमाबाबतची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर विहित वेळेत अद्यावत करण्‍यात यावी, असे आदेश जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages