Hot Posts

6/recent/ticker-posts

विधानसभेच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह, लोकसभेतील अपयशामुळे सत्ताधारी आमदारांमध्ये वाढली धाकधूक

विधानसभेच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह, लोकसभेतील अपयशामुळे सत्ताधारी आमदारांमध्ये वाढली धाकधूक



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भाजप महायुतीकडे २०० पर्यंत आमदार असतानाही लोकसभा निवडणुकीत राज्यातील जवळपास १६० विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना मताधिक्य मिळाले आहे. विधानसभेची निवडणूक चार महिन्यांवर असताना अशी स्थिती भाजपला परवडणारी नाही.

त्यामुळे आता प्रत्येक विधानसभानिहाय आपल्या उमेदवारांना किती मताधिक्य मिळाले, कोणत्या मतदारसंघात आपला उमेदवार पिछाडीवर राहिला, त्याची नेमकी कारणे काय, याचा आढावा पक्षश्रेष्ठीकडून घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या अनेक विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, या प्रमुख पक्षांकडे सद्य:स्थितीत २८८ पैकी अवघे ७१ आमदार आहेत. याउलट सत्ताधारी महायुतीकडे भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), या पक्षाकडे तब्बल १८५ आमदार आहेत. याशिवाय काही अपक्ष आमदारांचीही भाजप महायुतीला साथ आहे. तरीदेखील लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी केवळ १७ जागांवरच महायुतीला विजय मिळालेला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात, भाजपचे नऊ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केवळ एक खासदार निवडून आला आहे. या निवडणुकीत भाजपचे मतदान वाढले असले, तरी पक्षाच्या उमेदवारांचा पराभव म्हणजे नामुष्कीच आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाबरोबरच मतदारसंघातील आमदारांबद्दलची नाराजी देखील उघड झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात खांदेपालट होतील, असे महायुतीतील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे आगामी चार महिन्यात आपापला विधानसभा मतदारसंघ मजबूत करण्याचे आव्हान आमदारांसमोर असणार आहे.

१२ पैकी ११ आमदार महायुतीचे, तरी दोन्हीकडे पराभव

सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा ७४ हजार ते सव्वालाख मतांनी पराभव झाला आहे. सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघात सहापैकी केवळ 'शहर मध्य' या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार (प्रणिती शिंदे) असून उर्वरित अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर व पंढरपूर- मंगळवेढ्यातील आमदार भाजपचे तर मोहोळचे आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत. तरीदेखील याठिकाणी भाजपच्या उमदेवाराचा पराभव झाला. दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघातील सहापैकी सगळेच आमदार भाजप महायुतीचे असतानाही याठिकाणी भाजपला यश मिळाले नाही हे विशेष.

Reactions

Post a Comment

0 Comments