जुनी मिल ट्रस्टच्या सभासदांना ३५ वर्षांनी हक्काची जागा मिळणार, ९ जून रोजी ट्रस्टची सभा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- १९८८ साली सोलापुरातील बंद पडलेल्या जुनी मीलच्या जागा कोर्टाकडून लिलावात घेण्यासाठी कुमार करजगी यांनी जुनी मील बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती या ट्रस्टची स्थापना करून सभासदांकडून कोट्यावधी रुपये जमा करून १९९६ व ९८ साली ही जागा ट्रस्टच्या नावे कोर्ट रिसिव्हर कडून खरेदी घेतली. सोलापुरात जुनी मिल कंपाऊंड, कंबर तलाव जवळील मोतीबाग, हीरज रोड, जुनी पोलीस लाईन जवळील उमा नगरी व धरमसी लाईन अशा पाच ठिकाणच्या या जागा कब्जा पावती व नगर भूमापन कार्यालयाकडून ट्रस्टच्या नावे मोजणी करून घेतलेल्या होत्या.परंतु ट्रस्टच्या मूळ सभासदांना या जागा आज पर्यंत देण्यात आलेल्या नव्हत्या. १६ जानेवारी १९९८ साली आपल्या वडिलांच्या बाळ्यातील शेतावर प्रवर्तक विणा दाते यांच्यामार्फत बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली व आज सुद्धा ही जागा प्लॉट वाटप न करता शेतजमीनच आहे. जुनी मिल ट्रस्टची १३७ एकर जागा शहर उपनिबंधक यांना हाताशी धरून खोट्या कागदपत्राद्वारे याच उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेत वर्ग करण्यात आली व पुढे एक वर्षानंतर त्याच्या उमा १ ते १४ , वॉटर फ्रंट, द स्क्वेअर फ्लॅट अँड शॉप ओनर्स ओनर्स को-ऑप हाउसिंग सोसायटी अशा बोगस पोट संस्था बनवण्यात आल्या. नगर भूमापन कार्यालयातील १९९६ पासून ते आज पर्यंत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खोट्या कागदपत्राद्वारे खोट्या फेरफार व नोंदी बोगस नॉमिनी उमा सहकारी संस्थेचे नावे करण्यात आलेल्या आहेत. आमच्या ट्रस्टची कोणतीही नॉमिनी नव्हती व प्रॉपर्टी कार्डवर नॉमिनी अशी नोंद कधीच होऊ शकत नाही. या बोगस उमा व इतर संस्थेच्या जागेच्या नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया ट्रस्टतर्फे सुरू आहे.
सोलापूर महानगरपालिकेतील बांधकाम व नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्राथमिक नकाशांवर कोणतेही खरेदी विक्री अथवा बांधकाम करता येत नसताना येथे अवैधपणे विविध शैक्षणिक संस्था, घरांचे, मॉल व व्यवसायांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. भूमी व मालमत्ता विभागातील कर्मचाऱ्यांच्या संगणमताने येथे अनेक अवैध होर्डिंग उभे करण्यात आलेली आहेत. येथील अवैध बांधकामांवरचा कोट्यावधी रुपयांचा टॅक्स सोमपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने न भरून महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपये बुडवलेले आहेत. संस्थेच्या वरील १३७ एकर जागेतील सर्व लेआउट निष्काशीत करण्यात आलेले आहेत. या जागांवरील उमा सहकारी संस्थेच्या नावे मोजणी रोखण्यात आलेली आहे. उमा सहकारी संस्था व इतर सर्व संस्था रद्दबातल करण्याची प्रक्रिया उपनिबंधक यांच्याकडे सुरू आहे. या जागेतील नागेश करजगी ऑर्किड स्कूल ,संजय घोडावत अकॅडमी व इतर सर्व शाळा या पूर्णपणे अनधिकृत व विनावापरपरवाण्याच्या असल्यामुळे ट्रस्ट द्वारे त्या बंद करण्यात येतील त्यामुळे या शैक्षणिक संस्थेतील मुलांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. ट्रस्टची ही सर्व १३७ एकर जागा धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंद करण्यात आलेली आहे व धर्मादाय आयुक्त यांच्या परवानगीशिवाय या जागेचे कोणतेही व्यवहार करण्यास प्रतिबंध लादण्यात आलेले आहेत.
कुमार करजगी व त्याचे हस्तक स्वर्गीय शरद मुथा व सुरेंद्र कर्णिक यांनी ट्रस्टच्या मूळ सभासदांची फसवणूक करून या जागा अनधिकृतपणे खोट्या खरेदी खतांवर इतर लोकांना विकल्या आहेत त्यामुळे त्या जागा घेणाऱ्या लोकांची सुद्धा फसवणूक झालेली आहे. ट्रस्टमधील गैरव्यवहारासाठी कुमार करजगी व त्यांचे सर्व कार्यकारी मंडळ धर्मादाय आयुक्त यांनी २००६ साली कायमस्वरूपी बरखास्त केलेले आहे तसेच त्यांच्यावर धर्मादाय आयुक्त, जिल्हा व मुंबई उच्च न्यायालय यांच्या या जागेबाबत कोणतेही व्यवहार करू नयेत अशा सक्त मनाई असताना सुद्धा कुमार करजगी व त्यांच्या हस्तकांनी या जागेचे गैरव्यवहार केल्यामुळे कुमार करजगी व सुरेंद्र कर्णिक यांचा जामीन रद्द होण्याची प्रक्रिया मा. उच्च न्यायालय मुंबई येथे अंतिम टप्प्यात आलेली आहे.
कुमार करजगी व त्याचे हस्तक वरील ट्रस्टची जागा जुनी मिल कामगारांच्या वारसांना घरे बांधण्यासाठी दान करतो तसेच या ठिकाणी पत्रकार, माजी सैनिक ,पोलीस यांना मोफत घरे बांधण्यासाठी देतो अशा अफवा पसरवत आहे. या ठिकाणी अनधिकृतपणे बाल महोत्सव भरवणे ,लग्न समारंभ ,सर्कस, प्रदर्शने यांच्यासाठी अवैधपणे ही जागा देत आहे व लोकांचे फसवणूक करीत आहे.
ट्रस्टच्या जागेतून उड्डाणपूल जात असल्याने महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर कुमार कररजगीने कोणतेही अधिकार नसताना बैठक घेऊन या जागेबद्दल टीडीआर मागितला आहे व खोट्या सह्या केलेल्या आहेत. नगर भूमापन अधिकारी गजानन पोळ यांना हाताशी धरून नियोजित सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग व उड्डाणपूल यातील जागेवर बोगस उमा संस्थेची नावे लावून संगनमताने मोबदला लाटण्याचे कारस्थान सुरू आहे. कुमार करजगी ट्रस्टच्या लेटरहेडचा गैरवापर करीत आहे. अशाच पद्धतीने कुमार कररजगीने कोर्ट रिसिव्हर असल्याची खोटी बतावणी करून डी आर एम ,रेल्वे यांच्याकडून खोटी एनओसी मिळवलेली होती ती सुद्धा ट्रस्टने रद्द केलेली आहे.
३५ वर्षानंतर कुमार करजगी व त्याच्या हस्तकांच्या या सर्व बोगस कारवाया रोखण्यामध्ये जुनी मिल ट्रस्टच्या नवीन पदाधिकाऱ्यांना यश मिळालेले आहे. ट्रस्टच्या मूळ सभासदांना कायदेशीर रित्या जुनी मील जागेचे प्लॉट वाटप करण्यासाठी ९ जून २०२४, संध्याकाळी ५ वाजता ,समाज कल्याण केंद्र, रंगभवन चौक ,सोलापूर या ठिकाणी सभेचे आयोजन केलेले आहे. कुमार करजगी व त्याच्या हस्तकांच्या जुनी मील जागे बाबतच्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवून आपली फसगत करून घेऊ नये व या सर्व जागेतील अनधिकृत बांधकामे ,व्यवसाय, होर्डिंग्ज संबंधितांनी तात्काळ हटवून घ्यावीत अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या सर्व गैरव्यवहाराच्या तक्रारी मुंबई उच्च न्यायालय, धर्मादाय आयुक्त ,जिल्हा आधिकारी, नगर भूमापन अधिकारी ,सोलापूर महानगरपालिका व शहर उपनिबंधक यांच्याकडे केलेल्या आहेत.
0 Comments