Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न

 लोकमंगल कृषी महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, लोकमंगल कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे, मान्यवर प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे  शिवराज्याभिषेक सोहळा होय. प्रत्येक मराठी माणसासाठी हा दिवस अगदी सोनेरी दिवसच म्हणावा लागेल. यादिवसाबद्दल आजही लोकांमध्ये तितकेच प्रेम, आतुरता, श्रद्धा आणि आदर पाहायला मिळतो. ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला होता. मध्ययुगीन इतिहासात या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. मध्ययुगीन काळात देशावर परकीय शत्रूंचे वर्चस्व डोके वर काढत असताना शिवरायांनी शूर कामगिरी करत लोकांना या गुलामगिरीतून सोडवत स्वातंत्र्याची पहिली पहाट जनतेला दाखवली होती. याकाळात शिवरायांनी लोकांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला इतिहासासोबतच लोकांच्या मनात अनन्यसाधारण महत्व आहे. शिवरायांनी स्वराज्य स्थापित करत देशाच्या इतिहासाला नवसंजीवनी दिली होती. परकीय आक्रमणातील धूर्त आणि दुष्ट शत्रूंचा नायनाट करुन देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे मौल्यवान कार्य राजेंनी केलं होतं. शिवराज्याभिषेक हा गोरगरीब, दीनदुबळ्या जनतेच्या नवआयुष्याचा आणि उत्साहाचा सार सांगणारा सोहळा होता. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याने सामाजिक न्याय, बंधुता आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा पाया रचला होता. अशा या आपल्या छत्रपतींना राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त उपस्थिता तर्फे त्रिवार वंदन करण्यात आले. या सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रा. तुषार नामदे, प्रा. ज्ञानसागर सुतार, प्रा. नवनाथ गोसावी, प्रा. सोनिया रणवरे, प्रा. नम्रता गोरे, प्रा. स्वाती खोबरे, प्रा. सुकन्या जाधव, प्रा. प्रतीक्षा जायभाई, डॉ. आशिष तिवारी आणि प्रथमेश काळपांडे यांची तसेच विद्यार्थी प्रतिनिधींची विशेष उपस्थिती होती.
Reactions

Post a Comment

0 Comments