मुलांच्या स्वप्नांना प्रोत्साहन द्या त्यांना जे आवडते ते करू द्या : जोशी
कुमठे प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-परीक्षेत मिळालेल्या मार्गावर गुणवत्ता ठरत नाही हे मुलांसह पालकांनी लक्षात ठेवावे. मुलांचे अनेक स्वप्न असतात त्या स्वप्नांना प्रोत्साहन देणे पालकांचे कर्तव्य आहे. ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात मुलांनी करिअर करावे आणि पालकांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन असे जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे येथे दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद जोशी बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून किर्लोस्कर कंपनीचे एचआर मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने, विश्वस्त स्वाती माने आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांचा पालकांचा सत्कार अरविंद जोशी आणि ऋषिकेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना अरविंद जोशी पुढे म्हणाले की, आजच्या काळात शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञानही आवश्यक आहे. या पुढील काळात अभ्यासाच्या पद्धती बदलणार आहेत त्यानुसार शिक्षणातही बदल होणार आहेत याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. मोठ्या पगाराच्या मागे न लागता आपल्याला काय आवडते ते शिक्षण घ्यावे आणि त्यामध्ये करिअर करावे.
यावेळी ऋषिकेश कुलकर्णी म्हणाले की, सोलापुरातही दर्जेदार शिक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे मुलांनी मुंबई, पुणे येथे न जाता सोलापुरातच शिक्षण घ्यावे. इतर जिल्ह्यातील मोठ्या कंपन्या सुद्धा सोलापुरातील मुलांनाच नेहमी प्राधान्य देतात. त्यामुळे सोलापूरच्या मुलांमध्ये गुणवत्ता आहे हे सिद्ध होते. आजच्या मुलांनी कमी मार्क पडले म्हणून खचून न जाता अधिक परिश्रम करावे. आपल्या आवडीचे आणि काळानुरूप शिक्षण घ्यावे. जयकुमार माने यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला माने बँकेचे संचालक तानाजी शिनगारे, एसपीएमच्या प्राचार्य रोहिणी चव्हाण, प्रा. प्रकाश काशीद, प्रा. मलकरी कोरे, लिटिल स्टारच्या शुभांगी पवार, राष्ट्र विकास प्राथमिकच्या मंगल मोरे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयसिंग गायकवाड यांनी केले.
0 Comments