कायद्याचे राज्य | शब्द हे फालतू
चित्रकार वात्सल्याचं चित्र काढतात. प्रेमभावना प्रतिकांमधून प्रकट करणं, हा तर त्यांचा खास प्रांत. शौर्य-क्रौर्य, गुलामी, स्वातंत्र्य, वासना, भीती हे विषयही ते हाताळतात. पण आजपर्यंत एकाही चित्रकाराने कायदा ह्या विषयाचं चित्र रेखाटलेलं नाही. कदाचित, त्यांना सुव्यवस्थेचं चित्र कसं काढावं, हे कळलेलं नसावं. कायदा आणि सुव्यवस्था ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; म्हणूनच कायदा पक्षपाती असेल, तर सुव्यवस्थेला अव्यवस्थेचं स्वरूप प्राप्त होणं अवघड नाही. आज विकृत कायदे आणि विकृत व्यवस्था असाच प्रकार जगभर सर्वत्र दिसतो. विकृत कायदे आणि विकृत व्यवस्था यांची मुळं माणसाच्या मनातच दडलेली आहेत. इम्यॅन्युअल कांट हा बुद्धिवादी विचारवंत म्हणतो, 'माणसाची घडणच अशी झाली आहे की, त्यातून काही सरळ, निःसंदिग्ध, स्पष्ट निर्माण होईल, अशी अपेक्षाच करणं व्यर्थ आहे. 'म्हणूनच' कायद्याचं राज्य हे भोळ्याभाबड्यांना आश्वासक वाटणारे शब्द ही समाजाची शुद्ध फसवणूक असते, 'असं इंग्रजी साहित्यसम्राट ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांना वाटतं. ते म्हणतात, 'गरिबांना कायदा भरडतो; तर श्रीमंत कायदा भरडून टाकतात.
गोल्डस्मिथ आपल्या विचारातून श्रीमंतांच्या ज्या राक्षसी धनशक्तीचा निषेध करू पाहातात, तसाच तो महात्मा येशूच्या वचनातूनही प्रकट होतो. येशू म्हणाले, 'सुईच्या छिद्रातून एखादे वेळी उंट आरपार जाईल. पण श्रीमंत माणूस मात्र स्वर्गात कधीही जाऊ शकणार नाही. 'पण जगातील कोणत्याही कायदे करणाऱ्याच्या बुद्धीत वरील वचनांमुळे काही प्रकाश पडला नाही. येशूला मानणारं पाश्चात्त्य जग भांडवलशाहीला अनुकूल राज्यघटना आणि कायदे करीत असेल, तर तो येशूच्या शिकवणीचा अवमान नाही काय? या विसंगतीबद्दल कृतिशील विचारवंत लेखक माधवराव बागल म्हणतात, 'कोट्यवधी मजूर अन्न- अन्न करीत दारोदार भटकत असताना, कोटी रुपयांच्या राशीवर सुखाने झोपणाऱ्यास ख्रिश्चन कोण म्हणू शकेल?'
आज जगात शेकडो देश आहेत. त्यांच्या स्वतंत्र राज्यघटना आहेत. पण त्या साऱ्याच भांडवलशाहीचं लालन-पालन-पोषण करणाऱ्या आहेत. कारण त्या भांडवलवाल्यांनीच तयार केल्या आहेत! गरिबांचे न्याय्य हक्क डावलण्याचं कुकर्म अगदी इंग्लंडच्या मॅग्नाचार्टापासूनच केलं जात आहे. 'कोणाचाही हक्क अमान्य करणार नाही!' ह्या मॅग्नाचार्टाच्या मार्गदर्शक तत्त्वात भांडवलशाहीचं मूळ ज्या मालकी हक्कात आहे, तिच्या रक्षणाची हमीच देण्यात आली आहे. श्रीमंतांची पाठराखण म्हणजे गरिबांची नागवण ! श्रीमंतांना न्याय देणं म्हणजे गरिबांवर अन्याय करणं! हे साधं सूत्र अगदी भारतीय राज्यघटनेपर्यंत साऱ्या घटनापंडितांना का कळू नये?
'मालकी हक्क' हे एक जगभर माजलेलं घोर जंगलं आहे. जमीनदार, कारखानदार अशा हिंस्र श्वापदांचा ह्या जंगलात स्वैर संचार नेहमीचाच असतो. मजूर, नोकर यांची शिकार करून ही श्वापदं पुष्ठ होत आहेत. जगातील कोणतीही राज्यघटना आजतरी हे मालकी हक्कांचं जंगल नाहीसं करण्याविषयी का आग्रही नसावी? कायद्यांना जर शोषणकर्ता कोण आणि बळी कोण, हे कळत नसेल, तर त्याला भविष्यकाळ नसेल. भांडवलशहांनी जी पाशवी संस्कृती जन्माला घातली आहे, तिच्याशी टक्कर द्यायला गरिबांचीही पाशवी संस्कृती पैदा होण्याची ठळक चिन्हं आज दिसू लागली आहेत.
समाजहिताची काळजी करणाऱ्यांना मानवजातीपुढील संकटांची जाणीव होत असते. समाजहितचिंतक भाई माधवराव बागल भावी संकट टाळण्यासाठी सांगतात, 'गरिबीचा रोग मुळातून काढून टाकायचा, तर समाजदेहातील दूषित रक्त प्रथम काढून टाकलं पाहिजे. भांडवलशाही हे ते दूषित रक्त होय. त्याला समाजसत्ता हाच एकमेव रामबाण उपाय!' यासाठी कायदा कसा असावा? तर-
आई करी चिंता।अशक्त बाळाची, तशी कायद्याची।हवी नीती॥१
वडिल लावती।मुलांना वळण, धाकाच्या खालून।प्रेम दाटे॥२
आज कायद्याने।पोसले गुंडांना, त्राता गरिबांना।नाही कोणी॥३
कायद्याचे राज्य |शब्द हे फालतू, कुत्रा तो पाळतू।श्रीमंतांचा॥४
समतेचे तत्त्व।नाही कायद्यात, राही फायद्यात।लक्ष्मीपुत्र॥५
मालकीचा हक्क।नष्ट जो करील, जगा उद्धारील |कायदा तो॥ ६
डॉ.जे.बी.शिंदे
.jpg)

No comments:
Post a Comment