बियाणांच्या दरात वाढ आणि निर्माण झालेल्या खतांच्या टंचाईने शेतकरी धास्तावले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 17, 2024

बियाणांच्या दरात वाढ आणि निर्माण झालेल्या खतांच्या टंचाईने शेतकरी धास्तावले

 बियाणांच्या दरात  वाढ आणि निर्माण झालेल्या 

खतांच्या टंचाईने शेतकरी धास्तावले 


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-जिल्ह्यात यंदा कधी नव्हे तो मान्सून बरसल्याने बळीराजा सुखावला आहे. बऱ्यापैकी व पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी बळीराजाची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे बियाणांच्या दरात झालेली वाढ आणि निर्माण झालेल्या खतांच्या टंचाईने शेतकरी धास्तावले आहेत. कृषी विभागाने मुबलक खते उपलब्ध असल्याचा केलेला दावा फोल ठरला आहे. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यातही अनेक भागात चांगला पाऊस झाला. त्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली असून भिजलेल्या शेतजमिनीत वापसा आल्याने आता शेतकऱ्यांची खरीप पिकाच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन, उडीद, भुईमूग, तूर व मूग अशा पिकांचा समावेश आहे. यातील बहुतांश बियाणांचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेने वाढले आहेत. गेल्या काही वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात सोयाबीन आणि उडीद पिकाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे सोयाबीनबरोबरच उडीदाच्या बियाणांनाही मागणी वाढली आहे. 

कांदा बियाणांच्या दरात भरमसाठ वाढ

चालूवर्षी कांदा बियाणांच्या दरात जवळपास ८०० रुपये प्रतिकिलो इतकी भरमसाठ वाढ उत्पादक कंपन्यांनी केली आहे. गेल्यावर्षी पंधरा दिवसाचा अपवाद वगळता अत्यंत कमी दरात कांदा विक्री झाला. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर झाला असल्याचे सत्ताधाऱ्यांनी मान्य केले आहे. तरीही कांदा बियाणांच्या दरावर सरकारने नियंत्रण ठेवले नाही. अव्वाच्या सव्वा दराने कांदा बियाणे खरेदी करावे लागत आहे. बियाणे उत्पादक कंपन्यांच्या नफेखोर धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्यावर्षी बाजारात कांदा बियाणाचा दर प्रतिकिलो १३०० ते १४०० रुपये होता. यावर्षी तोच दर प्रति किलो २२०० रुपयापर्यंत गेला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages