महाराष्ट्रात एक ते तीन जून दरम्यान कोकण किनारपट्टी भागात पाऊस हजेरी लावणार ?
मुंबई(कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान खात्याने नुकताच एक सुधारित हवामान अंदाज जारी केला असून यामध्ये हवामान खात्याने केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणताय डख
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात जे जोरदार वारे वाहत आहेत ते आता बंद होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात एक ते तीन जून दरम्यान कोकण किनारपट्टी भागात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.
अर्थातच उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर तीन जून पासून ते 11 जून पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणजे उद्यापासून सुरू होणारा पाऊस तब्बल 11 दिवस बरसत राहणार आहे.
परंतु हा पाऊस भाग बदलत येणार आहे. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे एक ते तीन जून दरम्यान राज्यातील राजधानी मुंबई, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, लातुर, नादेड या भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.तीन जून पासून ते पाच जून पर्यंत राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापूर, लातुर, बिड, परभणी, जालना, नांदेड, यवतमाळ, नागपूर, हिंगोली, वाशिम, अकोला, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणापर्यत पावसाची हजेरी लागणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये सात जून पासून ते 11 जून पर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी दिला आहे. एकंदरीत उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे.
मात्र एखादा पाऊस पडला की लगेच शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. किमान एक ईतभर ओल गेल्यानंतरच पेरणी करावी असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या आधीच्या अंदाजात पंजाब रावांनी 8 जूनला महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असे सांगितले होते.
म्हणजेच आता महाराष्ट्रात मान्सून आगमनासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेती कामांना वेग द्यावा लागणार आहे. शेतीची बाकी राहिलेली कामे जलद गतीने पूर्ण करावी लागणार आहेत.

0 Comments