Hot Posts

6/recent/ticker-posts

रवींद्र धंगेकर यांनी रस्त्यावर उतरून अवैध व्यवसायासह पोलीसांना व राजकारण्यांना केलं टार्गेट

 रवींद्र  धंगेकर यांनी रस्त्यावर उतरून अवैध व्यवसायासह 

पोलीसांना व राजकारण्यांना केलं टार्गेट 

पुणे (कटूसत्य वृत्त):- पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताहेत. या खुलाश्यांमुळे शासकीय यंत्रणा कशी बरबटली आहे हे पाहायला मिळतंय. पोर्शे कार अपघात प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यानंतर आता पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली.माध्यमांनी जेवढं हे प्रकरण लावून धरलं तितकच हे प्रकरण आणखी एका व्यक्तीने लावून धरलं त्याचं नाव आहे रवींद्र धंगेकर. हे प्रकरण समोर आल्यानंतर थेट पुणे पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी धंगेकरांनी केली.या प्रकरणात जसे रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्याच पद्धतीने रवींद्र धंगेकर देखील रोज नवा मुद्दा घेऊन रस्त्यावर येत आहेत आणि आंदोलन करताहेत. त्यामुळे रवींद्र धंगेकर अग्रवाल प्रकरणात इतके आक्रमक का झालेत? नेमका त्यांचा अजेंडा काय आहे, हेच समजावून घेऊयात... 

पोर्शे कार अपघात आणि रवींद्र धंगेकर पुणे अपघात प्रकरण तापताच रवींद्र धंगेकर देखील आक्रमक झाले. पोलिसांनी एफआयरमध्ये ३०४ कलम न लावल्यामुळे अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्याचा आरोप धंगेकरांनी केला.कार्यकर्त्यांना घेऊन ते थेट येरवडा पोलीस स्टेशनमध्ये धडकले. तिथे त्यांनी आंदोलन केलं आणि कारवाईची मागणी केली. या प्रकरणात करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील यावेळी धंगेकरांनी केला. धंगेकरांनी थेट पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

पुणे अपघात प्रकरणात दोन एफआयआर

या प्रकरणात रवींद्र धंगेकर दररोज आवाज उठवत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने प्रशासनावर टीका केली. सुरुवातीला एफआयर मध्ये ३०४ कलम न लावल्यामुळे मुलाला जामीन मिळाल्याचं त्यांनी लावून धरलं, त्याचबरोबर दोन एफआयआर का करण्यात आले असा सवाल देखील धंगेकर यांनी उपस्थित केला.

पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला १४ तासांत जामीन मिळाला. जामीन देताना त्याला काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यामध्ये निंबंध लिहिण्यास देखील सांगण्यात आले. धंगेकरांनी ज्या ठिकाणी अपघात झाला, त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा आयोजित केली आणि पुणेकरांचे लक्ष या घटनेकडे वेधून घेतले. 

धंगेकर अधीक्षकांवर संतापले, कुलगुरूंना भेटले

हे सगळं सुरु असताना धंगेकरांनी त्यांचा मोर्चा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वळवला. धंगेकरांनी सुषमा अंधारे यांच्यासोबत थेट अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये धडक घेतली. अनेक अधिकारी हप्ते घेऊन बार, पबवर कारवाई करत नाहीत असा आरोप त्यांनी केला. कोण किती हप्ते घेतं याची संपूर्ण लिस्टच धंगेकरांनी वाचून दाखवली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना या सगळ्याचा जाब देखील विचारला. त्यातच पुणे विद्यापीठातील वसतीगृहात गांजा सापडल्याने धंगेकर आक्रमक झाले, त्यांनी कुलगुरुंची भेट घेत कारवाईची मागणी केली. 

रवींद्र धंगेकर इतके आक्रमक का झाले आहेत?

त्यामुळे पुणे प्रकऱणानंतर धंगेकर चांगलेच चर्चेत आले. धंगेकर आत्ताच का आक्रमक झाले, धंगेकरांचा नेमका अजेंडा काय आहे असे प्रश्न देखील या निमित्ताने विचारले जात आहेत. खरंतर पुणे अपघात प्रकरणाच्या आधीपासूनच पुण्यातील बार आणि पब संस्कृतीच्या विरोधात धंगेकर नेहमीच आवाज उठवत आले आहेत.पुण्याची संस्कृती, पुण्याची तरुणाई या बार आणि पबमुळे बिघडत असल्याचा आरोप सातत्याने धंगेकर यांनी केला होता. त्याविरोधात वेळोवेळी धंगेकर आवाज देखील उठवत आले आहेत. अनधिकृत बार आणि पबच्या विरोधात त्यांनी अनेकदा निवेदनं देखील दिली आहेत.त्याचबरोबर ललित पाटील प्रकरण देखील धंगेकर यांनी लावून धरलं होतं. पुण्यात ड्रग्जचं रॅकेट सुरु असल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता. अधिवेशनात देखील त्यांनी पुण्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणी आवाज उठवला होता. रात्री उशिरापर्यंत बार आणि पबला सुरु राहण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवानगीबाबत धंगेकरांनी अनेकदा आक्षेप नोंदवला आहे. 

पुण्याची प्रतिमा, धंगेकरांचं टार्गेट काय?

एकूण काय तर पब, बार आणि ड्रग्ज प्रकरणामुळे पुण्याची संस्कृती बिघडते आहे असं सातत्याने धंगेकर सांगत आले आहेत. अल्पवयीन मुले या संस्कृतीमुळे वाया जात असल्याचं देखील धंगेकर वेळोवेळी म्हणत आहेत. पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने दारु पिऊन दोन लोकांचा जीव घेतल्याने धंगेकरांच्या आरोपांना धार आली. त्यामुळे केवळ या प्रकरणासाठी नाही तर या आधी देखील धंगेकर या प्रश्नांसाठी अग्रभागी असल्याचं समोर आलं आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments