मुंबई (कटूसत्य वृत्त) :- राज्यातील २९ महापालिकांच्या निकालानंतर महापौरपदावरून सुरू असलेली राजकीय चुरस यावेळी जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीतही पाहायला मिळत आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी २१ जानेवारी रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र युती आणि आघाडींचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काही जिल्हा परिषदेतील निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले असले तरी काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वतंत्र राहिली आहे. भाजपही काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेशी युती करू नये, असा आग्रह स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली असून २२ जानेवारी रोजी अर्जाची छाननी होणार आहे. २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
दरम्यान, उर्वरित जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग प्रशस्त करणार्या आरक्षणासंदर्भातील तिढा आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत सोडवला जाणार आहे. विदर्भातील काही जिल्हा परिषदांचा समावेश असलेल्या या प्रकरणात आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांवर असल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या निवडणुकांचा निर्णय घेण्यात येईल.
निवडणुका घोषित न झालेल्या उर्वरित जिल्ह्यांत नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या जिल्ह्यांमधील निवडणुकांच्या भवितव्यावर थेट परिणाम करणार आहे.राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे की, युती-आघाडींचे निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मिळाल्यानंतरच जिल्हा परिषद निवडणुकांचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
0 Comments