अखेर मोहिते पाटलांनी शरद पवारांची घेतली पुण्यात भेट
पुणे (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज (ता. 11 एप्रिल) पुण्यात मोदी बागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटी वेळी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख, संभाजी ब्रिगेड हेही उपस्थित होते. त्यांची पवार यांच्यासोबत माढा लोकसभा मतदारसंघबाबत चर्चा सुरू आहे.माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटीलहे इच्छूक होते. मात्र, भाजपने माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मोहिते पाटील हे कमालीच नाराज झाले आहेत. त्यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मतदारसंघातून फिरताना त्यांच्या समर्थकांकडून मोहिते पाटील यांच्यावर शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासंदर्भात दबाव आणत होते. त्यामुळे मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती.दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी मोहिते पाटील यांनी भेट घेतली होती. तेव्हापासून मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार मोहिते पाटील यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील समर्थकांना बुधवारी (ता. १० एप्रिल) रात्री उशिरा पवारांना भेटण्यासंदर्भातचे निरोप देण्यात आले आहेत. या भेटीबाबत मोहिते पाटील यांच्याकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी चिन्हावर लढावे, यासाठी त्यांचे काका जयसिँह मोहिते पाटील हे प्रचंड आग्रही होते. मात्र, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपसोबत राहण्याची भूमिका होती. त्यामुळे राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मोहिते पाटील कुटुंबातही मतभिन्नता होती. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत कोण कोण प्रवेश करणार, याचीही उत्सुकता आहे.
0 Comments