धैर्यशील मोहिते पाटील यांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज भरला.
माढा(कटूसत्य वृत्त):-माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाशी उभा दावा मांडणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज (ता. १६ एप्रिल) कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज भरला. याशिवाय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनीही माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी न दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज आपला उमेदवारी अर्ज भरला.
दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा सोलापूर दौरा अचानक रद्द झाला, त्यामुळे मोहिते पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता साधेपणाने भरला.
धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील यांनी अकलूजहून आल्यानंतर प्रथम बाळे येथील श्री खंडोबाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरला. या वेळी त्यांच्यासोबत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे होते.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनीही माढ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, जयसिंह मोहिते पाटील होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली.
0 Comments