नववर्षाचे स्वागत निसर्गाच्या सानिध्यात
रोहिडा आणि तोरणा किल्ल्यावर होणार भटकंती; इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-थर्टी फर्स्टच्या निमित्ताने हॉटेल आणि रिसॉर्ट या ठिकाणी होणारा धिंगाणा आपल्या सर्वांना माहितीच आहे. दारू आणि इतर नको असलेल्या बऱ्याच गोष्टींमध्ये तरुणाई सहभागी होते. मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या निमित्ताने काहीतरी आगळवेगळं करण्याच्या उद्देशाने सोलापुरातील इको फ्रेंडली क्लबच्या वतीने गेल्या 8 वर्षांपासून नववर्षाचे स्वागत निसर्गाच्या सानिध्यात.. हा उपक्रम राबविला जात आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सह्याद्रीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील भोर आणि वेल्हे तालुक्यातील रोहिडा आणि तोरणा किल्ल्यावर भटकंती करून नववर्षाचे स्वागत होणार आहे.सोलापूर आणि पुणे येथून जवळपास 50 निसर्गप्रेमी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. यात महिला आणि लहान मुलांचाही उत्साही सहभाग असणार आहे.
नववर्षाच्या निमित्ताने नको असलेल्या गोष्टी टाळून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता यावा. इतिहास जाणून घेता यावा. उंचावर जाऊन नवीन वर्षाचा संकल्प करावा, या उद्देशाने गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असल्याचे इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे यांनी सांगितले.


0 Comments