Hot Posts

6/recent/ticker-posts

*वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न*

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न


सांगोला (कटूसत्य वृत्त):- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलितवामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाचीसन2023-24 या  वर्षाच्या शैक्षणिक  सहलीचे  सांगोला,मालवण,कुणकेश्वर,विजयदुर्ग,पावस,गणपतीपुळे,मार्लेश्वर,कोल्हापूर,सांगोला  कोकण दर्शन  आयोजन करण्यात आले होते.सदरील सहलीमध्ये   सहभागी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक तसेच नैसर्गिक बाबींचा प्रत्यक्ष अनुभव व अभ्यास करता आला. पहिल्या दिवशी आम्ही मालवणला पोहचलो. तेथे विद्यार्थ्यांना व शिक्षकांनी सिंधूदुर्ग किल्ला आणि बोटिंग चा आनंद घेतला. त्यानंतर तेथेच जवळ असलेल्या राॅक गार्डन मध्ये गेलो. तेथे खडकांवर ती आदळणाऱ्या लाटा पाहून मन प्रफुल्लित झाले. सर्वांनी या ठिकाणी वैयक्तिक व ग्रुप फोटो काढले. दिवस बुडत असताना आम्ही कुणकेश्वरला पोहचलो. शंभू महादेवाचे दर्शन करून मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो. पहिल्या दिवशी पाहिलेल्या गोष्टीच्या सौंदर्यात तसेच त्यांनी काढलेल्या फोटोच्या भावविश्वात मुले गाढ झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही कुणकेश्वरहून देवगडच्याच्या दिशेने कूच केले. पुढे जात असताना पवनचक्की, देवगडच्या सुंदर व लोभनिय समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यात हरवलो. पुढे विजयदुर्ग किल्ला आम्ही बोटिंग व पायी  दोन्ही प्रकारे पाहिला. किल्ल्याचे बांधकाम तसेच असणारी रचना याबद्दल माहिती घेऊन आम्ही पुढे  पावस करून गणपतीपुळे या ठिकाणी मुक्कामाला पोहचलो. तिसऱ्या दिवशी सकाळी साधारणतः 9 वाजण्याच्या सुमारास आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन करून मंदिराजवळच्या समुद्र किनारी पोहचलो. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्या ठिकाणी पोहण्याचा, बोटिंगचा तसेच रायडिंगचा आनंद घेतला पुढे आम्हाला मार्लेश्वर गाठायचे असल्याने इच्छा नसताना आम्ही तेथून लवकर मार्गस्थ झालो. मार्लेश्वर अतिशय सुंदर ,लोकप्रिय उंच डोंगररांगामध्ये वसलेले महादेवाचे मंदीर आणि समोरच्या बाजूला उंचावरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा पाहून सर्वांना फार आनंद झाला. दिवस ढळण्यास थोडासा अवधी असताना आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. अतिशय उंच अशा डोंगरामध्ये बनवलेल्या आंबा घाट रस्त्यावर असलेल्या प्रत्येक वळणावर आमच्या शरीरावर रोमांच उभे राहत होते. रोमांचक आणि हिरव्या गर्द झाडीत असणाऱ्या रस्त्याने आम्ही रात्री 10 चे सुमारास कोल्हापूर गाठले. तेथील सुप्रसिद्ध रंकाळा चौपाटीचा आनंद घेतला सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर दर्शन घेतले आणि आम्ही पहाटे- पहाटेला पुन्हा सांगोला येथे शाळेवर पोहचलो. सदर सहलीस मुख्याध्यापक पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले. सहल प्रमुख म्हणून संतोष कुंभार सर यांनी काम पाहिले सहल यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी त्याना त्यांच्या इतर सहकारी शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून प्रशालेतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे, भौगोलिक ,सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहता याव्यात व त्याची माहिती मिळावी म्हणून दरवर्षी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते  त्यांच्या सामान्य ज्ञानातही भर पडते,याचा पुरेपूर फायदा प्रशालेतील विद्यार्थ्यांना मिळतो . नीलकंठ शिंदे सर . सचिव:- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला .
Reactions

Post a Comment

0 Comments