ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरुक राहावे -जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विविध शासकीय स्टॉलला भेट देऊन
पाहणी केली
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- आजच्या स्पर्धेच्या युगातील ग्राहक हा बाजारपेठेत होणाऱ्या खरेदी विक्री व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे. परंतु ग्राहकाला आपली फसवणूक होऊ नये यासाठी नेहमी जागरूक राहावे लागेल. 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो, या दिवसापुरतीच जागरूकता ग्राहकांनी न ठेवता, वर्षभर ग्राहकांनी जागरूक राहून आपल्या हक्काचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित खाडे, सहाय्यक पुरवठा अधिकारी समीर यादव, अखिल भारतीय ग्राहक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत हरिदास, अखिल भारतीय ग्राहक सभेचे सदस्य दीपक इरकल, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हाप्रमुख शोभा सागर, ग्राहक समिती अध्यक्ष तानाजी गुंड, सदस्य राजेंद्र घाडगे आदि उपस्थित होते.
24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपती यांनी मंजुरी दिली, तेव्हापासून 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून प्रतिवर्षी साजरा केला जात असतो अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली. तसेच भारतीय राज्यघटना व ग्राहक हक्क कायद्याने ग्राहकांना दिलेल्या हक्काची माहिती ही त्यांनी यावेळी सविस्तरपणे दिली.
ग्राहक कायद्याने ज्या पद्धतीने ग्राहक म्हणून जे हक्क व अधिकार दिलेले आहेत त्या पद्धतीने प्रत्येक ग्राहकाचे एक नागरिक म्हणून अनेक कर्तव्यही पार पाडावी लागतात. ग्राहक म्हणून स्वतः सजग राहण्याबरोबरच इतरांनाही त्यांच्या हक्क व कर्तव्य विषयी जागरूक केले पाहिजे. कोणाचीही ग्राहक म्हणून फसवणूक होणार नाही यासाठी ग्राहक हक्क कायद्याविषयी प्रत्येकांना माहिती राहावी यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी केले.त्याप्रमाणेच ग्राहक तक्रार निवारण चे अध्यक्ष अशोक भैसारे यांनीही ग्राहकाची फसवणूक होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षता तसेच फसवणूक झाल्यानंतर तक्रार कशा पद्धतीने करून चांगली वस्तू अथवा पैसे परत कसे मिळवायचे या विषयी माहिती दिली. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असून कोणत्याही प्रकारे ग्राहकाची फसवणूक होणार नाही याची काळजी प्रत्येक सजग नागरिकांनी स्वतःहून घ्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
ग्राहक म्हणून बाजारपेठेत वस्तू खरेदी करत असताना प्रत्येकाला त्या वस्तूची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. नसेल तर संबंधित व्यापाऱ्यांकडून त्या गोष्टीविषयी संपूर्ण ज्ञान घ्यावे. तसेच खरेदी केलेल्या वस्तूची जीएसटी नंबर सह पक्की पावती प्रत्येकाने घेणे अनिवार्य असल्याचे मत अखिल भारतीय ग्राहक सभेचे अध्यक्ष दीपक इरकल यांनी व्यक्त केले. सध्याचे डिजिटल युगात ऑनलाईन खरेदी ही ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे तसेच या ठिकाणीही ग्राहकांची फसवणूक होऊ शकते तरी ऑनलाईन खरेदी विषयी ग्राहकांनी जागरूक राहिले पाहिजे. डिजिटल इंडिया ॲक्ट, ग्राहक सुरक्षा कायदा या विषयी त्यांनी सविस्तरपणे माहिती देऊन ग्राहक जर जागरूक असेल तर त्याची फसवणूक कोणीही करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
प्रभात फेरी-
राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने ग्राहक जनजागृतीसाठी सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर तसेच एनसीसीचे विद्यार्थी यांच्या वतीने चार हुतात्मा पुतळा ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापर्यंत ग्राहक प्रबोधन रॅली सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता काढण्यात आली. रॅलीचा समारोप जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन-
जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध शासकीय विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलचे तसेच राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फीत कापून उद्घाटन केले. येथील प्रत्येक स्टॉलला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली.तसेच येथे येणाऱ्या नागरिकांना विविध शासकीय योजनेची सविस्तर माहिती द्यावी तसेच पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ द्यावा, असेही त्यांनी निर्देशित केले.
स्टॉल -
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, वैद्यमापनशास्त्र यंत्रणा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सोलापूर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, समाज कल्याण विभाग, विक्रीकर विभाग आदी विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आलेले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राहक समिती सदस्य राजेंद्र घाडगे तर आभार सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी शिल्पा ओसवाल यांनी मानले.
0 Comments