"सच्चिदानंद सदगुरू श्री संतनाथ महाराज प्रतिवार्षिक पुण्यस्मरण अखंडनाम सप्ताह .....!
दिनांक 27 डिसेंबर ते 4 जानेवारी पर्यंत वैराग नगरी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमणार.....!!
नंदू महाराज काळेगांवकर आणि प्रा. प्रशांत भालशंकर यांची माहिती....!!!
वैराग (कटू सत्य वृत्त): - प्रति वर्षाप्रमाणे यंदाही बार्शी तालुक्यातील वैराग येथील ग्रामदैवत श्री संतनाथ महाराज अखंड नाम सप्ताहाचे आयोजन दिनांक 27 डिसेंबर 2023 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीत अतिशय उत्साही वातावरणात आयोजित करण्यात आल्याची माहिती
ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष भागवताचार्य ह.भ.प नंदकुमार रणशुर महाराज काळेगांवकर/ वैरागकर यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली . पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ह .भ. प . नंदकुमार रणशूर महाराज काळेगांवकर म्हणाले की, " प्रति वर्षाप्रमाणे यंदाही ग्रामदैवत संतनाथ महाराजांच्या पुण्यस्मरणा निमित्त हा अतिशय नेत्र दीपक सोहळा वैराग नगरीत संपन्न होत आहे. या सप्ताहामध्ये विठू नामाचा गजर वैराग नगरीत होणार असून वैराग नगरी दुमदुमणार आहे. " जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा, तोचि साधू ओळखावा" या संत तुकारामांच्या वचनाप्रमाणे वैराग पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांना या ज्ञानामृताचा लाभ व्हावा याच स्वच्छ आणि पारदर्शक विचारधारेतून ट्रस्टच्या माध्यमातून हा सोहळा गेल्या 45 वर्षापासून अखंडपणे अविरतपणे सुरू असल्याचे यावेळी महाराजांनी सांगितले. आपण समाजाचे देणं लागतो. समाजाने मला काय दिले यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो. हीच विचारधारा ठेवून गेल्या 45 वर्षापासून हा अखंड नाम सप्ताह सुरू असून पुढेही सुरूच राहील. मानवता धर्म वाचवण्यासाठी आणि संत विचार समाजात तळागाळात पोचविण्यासाठी आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. या सप्ताहामध्ये दिनांक 27 डिसेंबर 2023 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. ते पुढील प्रमाणे: - श्री ज्ञानेश्वरी पारायण, जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज गाथा अभंग भजन,महिलांचे भजन, हरिपाठ, प्रवचन सेवा, किर्तन सेवा, श्री ची धुप आरती,ह .भ.प.समस्त वैरागकर भजनी मंडळीची सेवा, महापुजा, अभिषेक, चरित्र वाचन जप,काल्याचे कीर्तन,गुलाल, महाप्रसाद आयोजन केलेले आहे स्वानंद सुखनिवासी वै.ह भ प.गुरुवर्य विष्णुपंत नारायण जोग महाराज वारकरी शिक्षणसंस्था , श्री क्षेत्र आळंदी यांच्या सौजन्याने संपन्न होत असलेला हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणार आहे. तरी या ज्ञानामृत सोहळ्याचा वैराग शहर आणि पंचक्रोशीतील , जिल्ह्यातील महिला पुरुष भाविकांनी लाभ घ्यावा .
असे आवाहन सच्चिदानंद सद्गुरु श्री संतनाथ महाराज प्रतिवार्षिक पुण्यस्मरण अखंड नाम सप्ताह समिती ट्रस्ट च्या वतीने भागवताचार्य ह भ प श्री ज्ञानेश्वर केशवराव रणशूर आणि ह भ प नंदकुमार रणशूर काळेगांवकर महाराज यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रा. प्रशांत भालशंकर, पत्रकार अरविंद मोटे आदी उपस्थित होते.

0 Comments