नाहीतर जनता आवाज उठवेल तर जड जाईल - जरांगे पाटील
कटूसत्य वृत्त :- मनोज जरांगे-पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेता असूनही तुम्ही सरकारच्या बाजूने बोलताय… कुठे उडी मारायचा विचार आहे का, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.
''ओबीसी आणि मराठे एकत्र असे म्हणणाऱया विरोधी पक्षनेत्याने दीड दिवसात टुणकन तिकडे उडी मारली आणि मराठय़ांना आरक्षण देऊ नका म्हणता. यासाठीच राहुल गांधी यांनी तुमच्या खांद्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली का? मराठय़ांच्या लेकरांना एकालाही मोठे होऊ देऊ नको, विधानसभेत कणखर भूमिका मांड आणि मराठय़ांना आरक्षण मिळू देऊ नकोस, असे राहुल गांधींनी सांगितले का?'' असा सवालही जरांगे-पाटील यांनी वडेट्टीवार यांना केला.
''सरकार म्हणाले, दोन दिवसांत टाईम वाढवून देऊ. आम्ही म्हणालो - लवकर द्या, नाहीतर जनता आवाज उठवेल तर जड जाईल. ही धमकी वाटली का तुम्हाला? तुम्ही म्हणायला पाहिजे होते, लवकर द्या मराठय़ांना आरक्षण नाहीतर जड जाईल. याला विरोधी पक्षनेता म्हणतात. तुम्ही तर सरकारच्या बाजूने बोलायला लागले. तुमच्यावर दडपण आणलंय की काय? तुमचा तिकडे उडी मारायचा विचार आहे का?'' असेही जरांगे-पाटील वडेट्टीवार यांना उद्देशून म्हणाले.
''आम्ही राजकारणासाठी करतोय की खऱया न्यायासाठी लढतोय हे मराठय़ांना माहीत आहे. मराठवाडय़ातल्या मराठय़ांना आरक्षण मिळत होते, पण या पठ्ठय़ाने सांगितले, महाराष्ट्रातील सर्व मराठय़ांना आरक्षण पाहिजे. एक भाऊ नाराज दुसरा खूष हे मी नाही पाहू शकत. समितीला राज्यभर काम करायला लावा. त्यामुळे मराठे लाखाने माझ्या मागे आहेत. आणि होय, तुम्ही विरोध करताय म्हणून माझा मराठा समाज कानाकोपऱयात एक झालाय, याचा मला गर्व झालाय आणि आहे, असेही जरांगे-पाटील यांनी छातीठोकपणे सांगितले.
0 Comments