खवणी येथील बिरुदेव यात्रा मोठ्या दिमाखात संपन्न....
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- ढोल ताशाच्या गजरात मोहोळ तालुक्यातील खवणी येथील ग्रामदैवत बिरुदेव यात्रा भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी विठ्ठल बिरुदेव साडेतीन घटका आपल्या शिष्यास भेटण्यासाठी आल्यानंतर परज जोड खराग हातात घेऊन जंगी जटा मोकळ्या सोडून ओल्या हळदीचे गाभे कपाळी लावून वाजत गाजत ढोल कैताळ घुमत आरवत मिरवत विठ्ठल बिरदेव आणि खेलोबाची भेट पारंपरिक पद्धतीने गुरुवार दि.१६ रोजी हजारों भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सत्य युगातील कहाणी धुलवडी दिवशी बैलाच्या पायात खड्याच्या रूपात देव आले. आणि तेथेच स्थायिक झाले. म्हणून धुलवडी दिवशी भाकणूक व आंबिलीचा कार्यक्रम तर भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी गुरु शिष्याची भेट. खवणी गावास सत्य युगामध्ये देवाच्या तलवारीचा मान ग्रामदैवत बिरोबा देवस्थानास देण्यात आला होता. तो मान गावातील पाटील कुटुंबाकडे आहे. तलवारीचा मान खवणी गावाकडून हिरावून घेण्यासाठी पोखरापूर येथील शेळवणी माळावरती रेस लागली होती. परंतु कैलासवासी पैलवान रामचंद्र बापूराव भोसले यांच्या धाडसाने आबादित राहिला.
या ग्रामदैवत यात्रेमध्ये सांस्कृतिक, ओव्याचा कार्यक्रम तर ग्रामदेवताची पालखी गावातून आरवत मिरवत निघते अनेक घरासमोर सडा रांगोळी मोठ्या उत्साहात काढली जाते. महिला बालगोपाळ मनभावे दर्शन घेऊन आरती ओवाळत फटाक्याच्या अतिशबाजीत स्वागत करून बिरूदेव मंदिरामध्ये भाकणुकीचा कार्यक्रम संपन्न होतो. पाऊस, पाणी, पीक, राज्य व देशाच्या राजकीय घडामोडी भाकणूकनंतर घरोघरी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर समाप्त झाली.
या यात्रेनिमित्त ग्रामस्थ, पुजारी, भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments