अमित शाह झाले अजित पवारांवर नाराज ?
पुणे (कटूसत्य वृत्त):- शरद पवार व कुटुंबीयांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन हात पुसतच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितकांना उधाण आले होते. डेंग्यूमुळे आजारी असलेले अजितदादा अचानक ठणठणीत कसे बरे झाले, याची एकीकडे चर्चा सुरू असतानाच, अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या.
मात्र, दिल्लीतून जी लाइन ठरवून दिली जाते ती आघाडी सरकारमध्ये सगळ्याच घटकपक्षांकडून पाळणे अधिक गरजेचे आहे. तुमच्याकडून ते होत नाही, असे सांगत अमित शाह यांनी अजितदादांना फटाके लावल्याचे सूत्रांनी सांगितले.
अजित पवार यांनी, खासदार प्रफुल्ल पटेल व खासदार सुनील तटकरे यांच्यासह अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट केवळ दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी होती, असे जरी सांगण्यात आले असले तरी या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना अजित पवार आजारी पडले. त्यांनी आरक्षणासंदर्भात कुठलीही भूमिका घेतली नाही. उलट सरकारमध्ये असूनही अजितदादा गटाच्या आमदारांनी सरकारविरोधात मंत्रालयासमोर आंदोलन केले होते. अजितदादा गटाच्या या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये बसू शकतो. त्यामुळेच अमित शाह यांनी आज थेट अजितदादांना बोलावून घेऊन त्यांना या मुद्दय़ावर चांगलेच फटकारल्याचे समजते.
मराठा आंदोलनावेळी तुम्ही गप्प का होता?
तुम्हाला मराठा चेहरा म्हणून सरकारमध्ये घेतले गेले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी तुम्ही गप्प का होता, असा सवाल शाह यांनी विचारला. त्यावर अजित पवार निरुत्तर झाल्याचे समजते. आघाडी पक्षात समन्वय असणे गरजेचे आहे. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आमच्या धोरणाला अनुसरूनच घटक पक्षांची भूमिका अपेक्षित आहे, असे सांगत अमित शाह यांनी जातनिहाय जनगणनेच्या व मुस्लिम आरक्षणाच्या अजित पवारांच्या मागणीवरून त्यांची कानउघाडणी केल्याचे समजते.
0 Comments