अद्वय हिरेंना भोपाळमधून अटक, ठाकरेंना मोठा धक्का !!
नाशिक (कटूसत्य वृत्त):- शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून अटक केली आहे. रेणुका सूत गिरणीच्या नावाखाली नाशिक जिल्हा बँकेतून घेतलेल्या 7.46 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न करता त्या कर्जाच्या पैशांचा दुरुपयोग केल्याच्या आरोपाखाली जिल्हा बँकेने गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा न्यायालयासह उच्च न्यायालयानेही अद्वय हिरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर फरार झालेल्या अद्वय हिरे यांना काही वेळापूर्वी मध्य प्रदेशच्या भोपाळमधून अटक करण्यात आली.
उद्धव ठाकरे गटाचे अद्वय हिरे हे मालेगावचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. हिरे घराण्याचं नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व राहिलं आहे. काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. नाशिक जिल्हा बँकेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता त्या कर्जाचा दुरुपयोग करण्यात आला, अशी तक्रार नाशिक जिल्हा बँकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये दिली होती. यानंतर पोलिसांनी अद्वय हिरे यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता. जवळपास 40-50 कोटींचं हे कर्ज आहे.
अद्वय हिरे हे यावर्षी जानेवारी महिन्यात ठाकरेंच्या शिवसेनेत आले. उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांना शिवबंधन बांधलं. अद्वय हिरे हे महाराष्ट्राचे माजी परिवहन मंत्री प्रशांत हिरे यांचे पूत्र आहेत. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दादा भुसे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यानंतर दादा भुसेंना आव्हान देण्यासाठी ठाकरेंनी अद्वय हिरे यांना शिवसेनेत घेण्याची खेळी केल्याचं बोललं गेलं.
0 Comments